नागपूर: प्रशिक्षण पूर्ण केलेल्या भारतीय राजस्व सेवेतील (आय.आर.एस.) 70 व्या तुकडीतील अधिका-यांचा प्रशिक्षणोत्तर- समारंभ राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी नागपूर येथे 20 एप्रिल 2018, शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. याप्रसंगी केंद्र शासनाचे वित्त सचिव डॉ. हसमुख अधिया हे समारंभाचे मुख्य अतिथी असतील तर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, (सी.बी. डी. टी.), नवी दिल्लीचे सदस्य श्री. बी.डी. विष्णोई सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी ही आय.आर.एस . अधिका-यांना प्रशिक्षण देणारी देशातील अग्रणी संस्था आहे. डिसेंबर 2016 मध्ये संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परिक्षेमार्फत 70 व्या तुकडीतील 151 अधिकारी व भूटान सरकारकच्या रोयाल भूटान सेवेतील 2 अधिकारी येथे प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. या
अधिका-यांना 16 महिन्यांमध्ये दिल्या जाणा-या प्रशिक्षणामध्ये आयकर कायदा व इतर प्रत्यक्ष कर कायदे यासंबंधीचे सखोल ज्ञान तसेच तत्सम करार कायदे, भारतीय दंड संहिता, पुरावा कायदा, दिवाणी संहिता कायदा, गुन्हेगारी दंड-प्रक्रिया संहिता, संपत्ती हस्तांतरण कायदा, बेनामी व्यवहार कायदा, तसेच कर-प्रशासनाच्या सर्व बाबींचा समावेश असतो. अधिका-यांच्या अभ्यासक्रमामध्ये लेखाशास्त्राचे तत्व, व्यवस्थापन, सायबर न्यायवैद्यकशास्त्र, वित्तीय तपास व वित्तीय न्यायवैद्यकशास्त्र हेदेखील समाविष्ट असतात. अधिका-यांमध्ये जनसेवेबद्दल संवेदनशीलता निर्माण करतानंच त्यांना माहिती अधिकाराचेही प्रशिक्षण दिले जाते.
प्रत्यक्ष कर वसुली व करचुकवेगिरीला आळा घालण्याच्या प्रमुख कार्याच्या प्रशिक्षणाशिवाय
अधिका-यांना पैशाच्या गैरव्यवहारासारख्या आर्थिक गुन्हे व विविध आर्थिक घोटाळे यांचा सामना करण्यासाठी सक्षम केले जाते. या अधिका-यांना भारतीय संसद, रिजर्व बँक ऑफ इंडिया, राष्ट्रीय रोखे बाजार संस्था (एन.आय.एस.एम), रोखे बाजार अशा विविध संघटनांसोबत जोडून या संघटनांच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती करून दिली जाते. प्रत्यक्ष कर-वसुली आणि कर-चुकवेगिरीला आळा घालण्याच्या प्रमुख कार्याच्या प्रशिक्षणाव्यतिरिक्त अधिका-यांना पैशाच्या गैरव्यवहारासारख्या आर्थिकगुन्हे व विविध आर्थिक घोटाळे यांचा तपास करण्यासाठी सक्षम केले जाते. ‘भारत-दर्शन’ आणि प्रत्यक्ष कामाच्या प्रशिक्षणाची(ऑन जॉब ट्रेनिंग) संधीही या अधिका-यांना मिळते. याशिवाय , आंतरराष्ट्रीय कर प्रणालींना समजून घेण्यासाठी विदेश अभ्यास दौ-याचेही आयोजन या प्रशिक्षणादरम्यान केले जाते. अधिका-यांच्या शारीरिक सुदृढतेच्या दृष्टीने त्यांना शारीरिक प्रशिक्षण म्हणून कराटे व योग यांचा अभ्यास करणे आवश्यक असते. त्यांच्यामध्ये खेळाडूवृत्ती जोपासण्यासाठी वार्षिक क्रीडा स्पर्धा महोत्सव -‘इन्टॅक्स’चेही आयोजन करण्यात येत असते.
भारतीय राजस्व सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिका-यांना सामान्य व संबंधित कायद्यासंदर्भात आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीने नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिवर्सिटी, बंगलुरू (एन.एल.एस.आय.यु ) सोबत सामंजस्य करार केला असून या विद्यापीठामार्फत कायदा, नैतिकता व प्रशासनासंबंधीचे प्रशिक्षण अधिका-यांना दिले जाते व या विद्यापीठाची व्यापार कायदामध्ये पदव्युतर पदविका ( पोस्ट ग़्रॅज्युऐट डिप्लोमा इन बिझनेस लॉ) अधिका-यांना प्रदान केली जाते.
प्रशिक्षणोत्तर- समारंभानंतर या अधिका-यांची नेमणूक ‘सहायक आयुक्त’ म्हणून सर्व भारतभर केली जाते.