नागपूर: वकिली क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींना प्रत्येक दिवशी नवनवीन आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे ‘साहसी’ वृत्ती असणे आवश्यक असते. आव्हाने पेलू इच्छिणाऱ्यांनी विधी क्षेत्र करीअर म्हणून निवडले तरच त्यांना यशाची शिखरे गाठता येतील, असे विचार मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड. ए. हक यांनी व्यक्त केले.
डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे ‘करियर म्हणून कायद्याचा अभ्यास’ विषयावर महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ व साप्ताहिक युवा करियरच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजेंद्र कुमार उपस्थित होते. तसेच सेवानिवृत्त न्यायमूर्ती आर. सी. चौहान, अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य न्यायमूर्ती सी. एल. थूल, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एन. एम. साखरकर आदी उपस्थित होते.
मुलांमध्ये लहानपणापासूनच त्यांच्या आवडी-निवडीनुसार करिअर म्हणून कुठल्या क्षेत्राची निवड करणार याबाबत आवड निर्माण केली पाहिजे. मुलांचे करिअर घडविण्यामध्ये जितका शिक्षकांइतकाच आई-वडीलांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे मुलांच्या मनासारख्या क्षेत्रात त्यांना पुढे जाण्याची संधी दिली तरच ते यशाचा उंच शिखर गाठू शकतात, असे न्यायमूर्ती झेड. ए. हक म्हणाले.
कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. युवकांना कायदेपंडीत व्हायचे असेल तर मानसिकदृष्ट्या त्यांनी यासाठी तयार असावे. विधीचा अभ्यास हा उपजिवीकेसोबतच देशसेवेची संधी देत असतो. त्यामुळे सन्मान मिळवून देणाऱ्या क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक बदल घडविण्याची जबाबदारी युवकांनी उचलावी, असे आवाहन सेवानिवृत्त न्यायमूर्ती आर. सी.चौहान यांनी केले.
व्यावसायीक क्षेत्रातदेखील कायदे पंडीतांची गरज भासू लागली आहे. त्यामुळे हा पेशा केवळ न्यायालयापुरता मर्यादित नाही. हे क्षेत्र व्यापक होत आहे. कार्पोरेट क्षेत्रातही तरुण-तरुणी करिअर करू शकतात, असे सांगतांना न्यायमूर्ती सी. एल.थूल म्हणाले की, त्यांना खेळामध्ये आवड होती. परंतू काही कारणास्तव त्यांना वकिली क्षेत्रात उतरावे लागले. असे असले तरी देखील न्यायदानाच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी पार पाडण्याची संधी ही अभिमानास्पद होती, असे ते म्हणाले.
कुलगुरु डॉ. विजेंद्र कुमार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, संपादक मोनाल थूल यांनी चर्चासत्रात समायोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार आस्था दुबे यांनी मानले.