नागपूर: धरमपेठ झोनचे नवनिर्वाचित सभापती प्रमोद कौरती यांनी गुरुवारी (ता. २६) सभापतीपदाची सूत्रे स्वीकारली. महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर देशमुख, उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी त्यांचा सत्कार करीत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी धरमपेठ झोन कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. आमदार सुधाकर देशमुख, उपमहापौर दीपराज पार्डीकर, नवनिर्वाचित झोन सभापती प्रमोद कौरती, स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, पश्चिम नागपूर भाजपचे अध्यक्ष किसन गावंडे, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा कीर्तिदा अजमेरा, चिंतामण इवनाते, स्थायी समितीचे माजी सभापती संदीप जाधव, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक सुनील हिरणवार, अमर बागडे, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, शिल्पा धोटे, रुतिका मसराम, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे यावेळी मंचावर उपस्थित होते.
प्रास्ताविकातून स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले यांनी झोन सभापतींच्या जबाबदारीची माहिती दिली. सभापतीपद संवैधानिक असून नगरसेवकांच्या सहकार्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून विकास कामे करवून घेणे, ही जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्ष हे निवडणुकीचे असल्याने श्री. कौरती यांनी विशेष काम करून आपली छाप उमटविण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार सुधाकर देशमुख म्हणाले, आदिवासी समाजातील एक कर्मठ कार्यकर्ता, सचोटीने कार्य करणारा पक्षाचा सच्चा सेवक सभापती झाल्याने झोनच्या विकासकामांना नक्कीच गती मिळेल. श्री. कौरती यांना प्रशासनिक आणि संघटनात्मक कार्याचा अनुभव अहे. केंद्र, राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्या विविध कार्यक्रमांची, योजनांची सांगड घालून नवीन काहीतरी ते करतील, असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, राज्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात ज्या गतीने विकासकामे होत आहेत त्याच गतीने नागपुरात विकासकामे होत आहे. नागपूर स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. विकासाची ही गती लोकप्रतिनिधींनी समजून घेऊन नागरिकांना त्याच्याशी अवगत करण्याचे कार्य करावे. धरमपेठ झोनचे नेतृत्व आता एका सच्चा कार्यकर्त्याकडे आले आहे. त्यामुळे पूर्वीच ‘आदर्श’ असलेला धरमपेठ झोन विकासकार्यात उच्चांक गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी नगरसेवक संदीप जाधव, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल यांनीही मार्गदर्शन करीत सभापती प्रमोद कौरती यांना शुभेच्छा दिल्या.
यानंतर सभापतींच्या दालनात प्रमोद कौरती यांनी सभापतीपदाची सूत्रे स्वीकारली. आमदार सुधाकर देशमुख, महापौर नंदा जिचकार यांच्यासह सर्व मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत व सत्कार केला.
कार्यक्रमाचे संचालन अनिरुद्ध पालकर यांनी केले. आभार धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी मानले. कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.