Published On : Thu, Apr 26th, 2018

भांडेवाडीच्या कचऱ्यातूही होणार आता वीजनिर्मिती

NMC on Power Genration by Bhandewadi garbage
नागपूर: शहरातील भांडेवाडी येथील डम्पिंग यार्डमुळे परिसरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याचे पाऊल नागपूर महानगरपालिका उचलत आहे. याचाच एक भाग म्हणजे ज्या कचऱ्याचे विघटन होऊ शकत नाही अशा दररोजच्या सुमारे ८०० मेट्रिक टन कचऱ्यापासून ‘वेस्ट टू एनर्जी’ या प्रकल्पांतर्गत वीज निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला सुरुवात झाली असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दररोज सुमारे ११.५ मेट्रिक टन वीज निर्माण होणार आहे.

विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणातील विघटन न होऊ शकणारा कचरा या प्रकल्पामुळे दररोज नष्ट होणार आहे. या कचऱ्यामुळे मिथेन गॅसची निर्मिती होत असून त्यामुळे भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये आग लागण्याचे प्रमाण वाढले होते. विषारी धुरामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी नुकताच भांडेवाडी डम्पिंग यार्डचा दौरा केला होता. या दौऱ्यानंतर प्रशासनाने उपाययोजनांसाठी तातडीने पावले उचलली असून त्यावर अंमलबजावणी सुरू झाली आहे. याच उपाययोजनांची माहिती गुरुवारी (ता. २६) नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात झालेल्या बैठकीत आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिली.

बैठकीला महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे, मनपाच्या आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक दुनेश्वर पेठे, माजी नगरसेवक किशोर पराते, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, श्री. लुंगे व भांडेवाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते. आमदार कृष्णा खोपडे यांनी नागरिकांच्या वतीने भांडेवाडी डम्पिंग यार्डच्या समस्येबाबत माहिती दिली. लोकांच्या भावना लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेवक दुनेश्वर पेठे यांनीही त्याबाबत सविस्तर माहिती दिली.

Gold Rate
Saturday 01 Feb. 2025
Gold 24 KT 82,700 /-
Gold 22 KT 76,900 /-
Silver / Kg 94,100 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘बायोमायनिंग’ काढणार जुना कचरा
भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये अनेक वर्षांपासून कचरा साठवला जात आहे. हा जुना कचरा काढण्यासाठी ‘बायोमायनिंग’चा प्रकल्पही नागपूर महानगरपालिका हाती घेत आहे. सुमारे १० ते १२ लाख मेट्रिक टन कचरा काढून त्यातून निघणारा धातू सीमेंट कंपन्यांना पुरविण्यात येणार आहे. गांडूळ खत प्रकल्पही तेथे राबविण्यात येणार असल्याचे आयुक्त अश्विन मुदगल यांनी सांगितले.

‘मिथेन’ गॅस काढण्यासाठी निरीची मदत
भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये साचलेल्या कचऱ्यात मिथेन गॅसची निर्मिती होते. आग लागण्याचे हे मुख्य कारण आहे. मुंबई येथील देवनार डम्पिंग यार्डच्या धर्तीवर नागपुरातील भांडेवाडीमध्येही आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून निरी त्यासाठी सहकार्य करीत आहे. निरी एक तंत्रज्ञान मनपाला देत असून यामुळे कचऱ्याच्या आतमध्ये असलेले मिथेन काढता येईल. पुढील तीन दिवसात सविस्तर आराखडा निरी मनपाकडे सादर करणार आहे.

यार्ड हलविण्यासाठी केली १६ गावांची पाहणी
नागरिकांच्या मागणीनुसार भांडेवाडी येथील डम्पिंग यार्ड इतरत्र हलविण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासनाने १६ गावांलगतच्या जागांची पाहणी केली. मात्र, काही कारणांमुळे त्या ठिकाणी यार्ड हलविता येऊ शकत नसल्याचे आयुक्त मुदगल यांनी सांगितले. पाचगाव लगतच्या बंद पडलेल्या खाणींमध्ये यार्ड हलविण्याची सूचना माजी नगरसेवक किशोर पराते यांनी मांडली. तेथील विचारही प्रशासनाने केला. मात्र, त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाची हरकत असल्याचे श्री. मुदगल यांनी सांगितले.

झोनल अधिकाऱ्यांना बदलण्याच निर्देश
नागरिकांनी बैठकीत केलेल्या तक्रारीनंतर आयुक्त अश्विन मुदगल यांनी भांडेवाडी येथे नियुक्त करण्यात आलेले झोनल अधिकारी गोरे यांनी तातडीने बदलून नवीन अधिकारी देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यार्डमधील संपूर्ण सुरक्षा रक्षक बदलण्याचेही निर्देश त्यांनी दिले. जेथे विद्युत दिवे नसतील तेथे विद्युत दिवे आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा तातडीने लावण्याचे निर्देशही दिलेत. भांडेवाडीकडे कचरा वाहून आणणाऱ्या ट्रकवरील कचरा झाकून तेथे नेण्याचे निर्देशही दिले.

हंजरला टाकणार काळ्या यादीत
कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नेमण्यात आलेल्या ‘हंजर’ या कंपनीच्या दुर्लक्षामुळे अनेक समस्या निर्माण झाल्यात. करारानुसार काम न करणाऱ्या हंजर या कंपनीचा करार रद्द करून काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहितीही आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिली.

Advertisement