नागपूर: असे म्हणतात की, ईश्वर एक शक्ती काढून घेतो तर दुसरी तेवढीच प्रबळ शक्ती देतो सुद्धा. रविवारच्या सायंकाळी कविवर्य सुरेश भट सभागृहात अश्याच दृढ मनःशक्तीचा, आत्मशक्तीचा अनुपम कलाविष्कार नागपूरकरांनी अनुभवला.
डॉ. सैय्यद पाशा व त्यांच्या पत्नी माहिरा जान पाशा यांच्याद्वारे प्रशिक्षित ‘दिव्यांग नर्तकांनी’ चक्क व्हीलचेयर आणि कुबड्यांच्या साहाय्याने सेमी-क्लासिकल नृत्याचा अप्रितम असा नजराणा पेश केला. डॉ. पाशा हे स्वतः एक प्रशिक्षित भरतनाट्यम नर्तक आहेत. याप्रसंगी कलाकारांनी व्हीलचेअर सुफी डान्स, दुर्गास्तुती, शिवतांडव, गणेशवंदना, बाहुबली चित्रपटातील गीतावर नृत्य, भगवद्गीता आणि दशावतार दर्शन तसेच ‘कँधो से मिलते हैं कँधे’ आणि ‘मां तुझे सलाम’ या देशभक्तीपर गाण्यांवर नृत्य सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कलापथकातील ६ कलाकार हे मूक-बधिर होते. आश्चर्य म्हणजे पार्श्वसंगीत ऐकू येत नसताना देखील हे कलाकार आपल्या सहकाऱ्यांसह सुयोग्य ताळमेळ राखत नृत्य करीत होते. हे रहस्य डॉ. पाशा यांनी कार्यक्रमाच्या अंती उलगडले.
डॉ. पाशा यांना त्यांच्या असामान्य कल्पनेसाठी व दिव्यांग बांधवांच्या मनात आत्मविश्वास जगविण्यासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे भगवद्गीतेवरील सादरीकरणात श्रीकृष्णाचे पात्र साकारणारा कलाकार मुस्लिम तर अर्जुनाचे पात्र साकारणारा कलाकार ख्रिश्चन असल्याचा खुलासा पाशा यांनी केला. बंधुभाव आणि समानता यांचा जिवंत उदाहरण यानिमित्ताने रसिकांनी पाहिले. एकदा भारतात जन्म घेतला की या पवित्र भूमीची संस्कृती रक्तात भिनते असे मत त्यांनी व्यक्त केले. आपण बालपणापासूनच महाभारत, वेद, पुराण या हिंदू साहित्याच्या व्यासंगसोबतच मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात देखील जात असे, अशी स्पष्टोक्ती डॉ. पाशा यांनी दिली.
छात्र जागृती आणि राजस्थानी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने “डान्स ऑन व्हील्स” हा सेमी-क्लासिकल नृत्याचा कार्यक्रम कविवर्य सुरेश भट सभागृह येथे २९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची निर्मिती डॉ. सैय्यद सलाउद्दीन पाशा यांच्या मिरॅकल ऑन व्हील्स या संस्थेने केली आहे. याप्रसंगी यवतमाळ येथे कीटकनाशकाच्या दुष्प्रभावाने मृत्युमुखी पडलेल्या ३ शेतकऱ्यांच्या विधवा अनिता ज्ञानेश्वर टाले (रा. चिखली, तहसील आर्णी), विठाबाई शंकर गेडाम (रा. टाकळी, तहसील मारेगाव), रंजना कांबळे (यवतमाळ) यांना मदत म्हणून आ. गिरीश व्यास, माजी खासदार अजय संचेती इतर मान्यवरांच्या हस्ते २१ हजारांच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे अनेक शासकीय आणि गैरशासकीय पुरस्कारांचे विजेते एक यशस्वी दिव्यांग उद्योजक जयसिंग कृष्णराव चव्हाण, यशस्वी दिव्यांग उद्योजक माधुरी टावरी आणि अभियंते रविकिरण महाजन यांचा सत्कार करण्यात आला. तरुणपणी महाजन यांचा पायाखालचा भाग अर्धांगवायूमुळे अचेतन झाल्यानंतर देखील हार न मानता ते जिद्दीने आपले काम करत राहिले. तब्बल १००० दिवस अंथरुणावर काढल्यानंतर योगाभ्यास आणि आहार चिकित्सेच्या कठोर पालनातून ते आज पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. गिरीश व्यास, प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार अजय संचेती तर विशेष अतिथी म्हणून तर नागपूर भाजपचे कोषाध्यक्ष राजेश बागडी, जयप्रकाश गुप्ता, सदस्य महाराष्ट्र प्रदेश भाजप आणि सुनील अग्रवाल वरिष्ठ नगरसेवक, नागपूर मनपा, माजी नगरसेवक तळावी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक छात्र जागृतीचे सचिव आणि नगरसेवक ऍड. निशांत गांधी तसेच राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा पद्मश्री सारडा देखील मंचावर उपस्थित होत्या.