मुंबई : “पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात भाजपा नेते एकनाथ खडसे यांना दिलासा मिळाला आहे . दरम्यान खडसेंना न्यायालयाने क्लिन चिट दिली. पुण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खडसेंवरील आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. याप्रकरणी खडसेंनी एका वृत्त वाहिनीशी बोलतांना आपल्या भावना व्यक्त केल्या. माझ्यावर हेतूपुरस्सर आरोप झाले. पण चौकशीतून सत्य समोर आलं. ज्यांनी माझ्यावर आरोप केले, ते तोंडघशी पडले. दोषी असेन तर फाशी द्या, पण निर्दोष असेल तर सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केले आहे.
महसूल मंत्री असताना पदाचा गैरवापर करुन नातेवाईकांना फायदा दिल्याचा आरोप एकनाथ खडसेंवर होता. परंतु खडसेंवरील आरोप सिद्ध झाले नाहीत, असा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिला आहे.
“माझ्या जवळच्या माणसांनी किती गद्दारी केली हा आता बोलण्यासारखा विषय नाही. जे मी पाहिलंय, अनुभवलंय ते मनात ठेवून आपलं काम करत राहायचं. असं होत राहतं,” असंही खडसे म्हणाले.
खडसे म्हणाले, दोन वर्ष मला आणि माझ्या कुटुंबीयांसाठी अस्वस्थ करणारी होती. मी कोणतीही चूक केली नव्हती. त्यामुळे निर्दोष सुटणार असा विश्वास होता. कोणत्याही राजकीय पक्षाने माझ्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती. फक्त सुपारी बहाद्दर आणि कथित समाजसेवक माझ्या राजीनाम्याची मागणी करायचे. मी नैतिक जबाबदारी म्हणून स्वतःहून राजीनामा दिला होता. दरवेळी मंत्रिमंडळ विस्तार आला की माझ्यावर आरोप केले जायचे, असे त्यांनी सांगितले.