नागपूर: नागपूर महानगरपालिकेद्वारे सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजनेअंतर्गत एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या नऊ लाभार्थ्यांना अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. बुधवारी (ता.२) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ. नरेंद्र बहिरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, नोडल अधिकारी डॉ.ख्वाजा, श्रीमती परांजपे, सूर्यवंशी, पाटील, श्री. मेंढे प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार कुटुंब नियोजन केलेल्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत धनादेश वितरित केले जातात. एका मुलीनंतर शस्त्रक्रिया केलेल्या लाभार्थ्यांना दोन हजार रोख आणि आठ हजार धनादेशाच्या स्वरूपात आणि दोन मुलीनंतर शस्त्रक्रिया केलेल्या लाभार्थ्यांना प्रत्येक मुलीमागे चार हजारांचा धनादेश वितरित करण्यात येत असतो. नागपूर महानगरपालिकेद्वारे या योजनेअंतर्गत नऊ लाभार्थ्यांना यावेळी धनादेश वितरित करण्यात आले.
ही योजना ३१ जुलै २०१७ पासून बंद झालेली आहे. १ ऑगस्ट २०१७ पासून ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही सुधारित योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत राबविण्यात येत असल्याची माहिती डॉ.विजय जोशी यांनी दिली.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. कार्यक्रमाची प्रास्ताविक डॉ. विजय जोशी यांनी केले. आभार नोडल अधिकारी डॉ. ख्वाजा यांनी मानले.