मुंबई: मिळकतीपेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याप्रकरणी आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरींग कायद्याखाली तब्बल दोन वर्षांपासून तुरुंगात बंधिस्त असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना आज जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे छगन भुजबळ याना तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला असून ते लवकरच बाहेर येतील असे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कालच परत एकदा मुंबई उच्च न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. या जामीन अर्जावर काल सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर आज मुंबई उच्च न्या्यालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे 45(1) हे कलम नुकतेच रद्द केले आहे. त्याचा लाभ घेत आपल्याला जामिनावर सोडण्यात यावे, असा विनंती अर्ज भुजबळ उच्च न्यायालयात दाखल केला आहे. बुधवारी न्यायमूर्ती पी.एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा दोन वर्षांपेक्षा अधिक काळ आपण तुरुंगात बंधिस्त आहोत, आपले वय आता ७१ वर्षे झाले आहे, त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन आपली जामिनावर सुटका करावी, अशी विनंती त्यांनी उच्च न्यायालयात केली होती. त्यानंतर आज त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला.