नागपूर: पाण्यासंदर्भात नागरिकांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर येत आहेत. यासंदर्भात ओसीडब्ल्यूचे अधिकारी दखल घेत नाही. नागरिकांच्या समस्या गांभीर्याने व प्राधन्याने सोडविण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार जलप्रदाय समितीच्या वतीने झोन निहाय बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत बुधवारी (ता.९) धरमपेठ झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभागातील नगरसेवकांची बैठक झोन कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, उपसभापती श्रद्धा पाठक, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, नगरसेवक अमर बागडे, हरिश ग्वालबंशी, कमलेश चौधरी, नगरसेविका रूतिका मसराम, दर्शनी धवड, उज्ज्वला शर्मा, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, उपअभियंता प्रदीप राजगिरे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी झोनअंतर्गत येणाऱ्या पाण्याच्या समस्या नगरसेवकांनी महापौरांपुढे मांडल्या. काही प्रभागांमध्ये पाण्याचा दाब कमी असल्याची नगरसेवकांनी तक्रार केली. पाण्याचा प्रवाह नियमित करण्याचे व पाणी वेगाने कसे येईल, याबाबत विचार करून तक्रार तीन दिवसात सोडविण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
प्रभागामध्ये काही ठिकाणी पाण्याचे मीटर लावले आहे आणि काही ठिकाणी लावले नाही, अशी समस्या नगरसेवक कमलेश चौधरी आणि नगरसेविका रूतिका मसराम यांनी केली. याबाबत बोलताना महापौरांनी प्रत्यक्ष ठिकाणी नगरसेवकांसोबत दौरा करून पाहणी करावी, ज्या ठिकाणी मीटर लावणे शिल्लक आहे, त्या ठिकाणी मीटर लावण्यात यावे, असे निर्देश दिले.
धरमपेठ, रामदासपेठ या भागातही पाण्याच्या कमी दाबाची समस्या मोठ्या प्रमाणावर असल्याची तक्रार संजय बंगाले यांनी केली. त्यावर बोलताना या सर्व समस्या तातडीने सोडविण्यात याव्या, जर पाणी समस्या सोडविल्या नाही तर ओसीडब्ल्यूवर दंड आकारण्यात येईल, असा इशारा महापौर नंदा जिचकार यांनी दिला.
यावेळी बैठकीला ओसीडब्ल्यूचे राजेश कारला आणि प्रवीण शरण यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.