अमरावती: येथील रॉयली प्लॉट येथील सतीधाम मंदिरालगतच्या गोवर्धननाथ हवेली स्थित व्यापारी संकुलातील चार दुकाने शुक्रवारी सकाळी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या भीषण आगीत लाखोंचा साहित्य जळून खाक झाले. बघ्यांची गर्दी उसळल्यामुळे अग्निशमनला आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागले.
व्यापारी संकुलात राजू मिश्रा यांचे कामाक्षी लाइटस व सोना कलेक्शन नावाचे दुकान आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता मिश्रा यांच्या पत्नी भावना दुकान उघडण्यासाठी गेल्या असता, त्यांना दुकानातून आगीचे लोळ बाहेर पडताना दिसले. या घटनेच्या माहितीवरून अग्निशमन कर्मचाऱ्यांनी एक बंब घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, आगीची भीषणता पाहून आणखी बंब बोलाविण्यात आले. काही वेळात अग्निशमनचे अधीक्षक भरतसिंग चव्हाण व ट्रान्सपोर्ट उपकेंद्र प्रमुख सैयद अन्वर यांच्यासह अन्य अग्निशमनचा ताफा पाण्याचे बंब घेऊन रॉयली प्लॉट परिसरात दाखल झाले.
घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी असल्यामुळे पाण्याचे बंब घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला. यादरम्यान व्यापारी प्रतिष्ठानातील बहुतांश मुद्देमाल जळून खाक झाला होता. अखेर पाण्याच्या ११ बंबाचा वापर केल्यानंतर आग आटोक्यात आली. घटनेच्या माहितीवरून कोतवाली ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील, पीएसआय नरेश मुंढे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी बघ्यांची गर्दी कमी करून सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांना पांगवले.