मुंबई : बोंडअळीमुळे कापूस, तुडतुड्यामुळे धान आणि ओखी वादळामुळे मच्छिमार बोटींचे झालेले आर्थिक नुकसान मोठे असून केंद्र सरकारने जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पाहणी पथकाला केले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज मुख्यमंत्र्यांच्या समवेत केंद्रीय पाहणी पथकाची आढावा बैठक झाली.
मुख्यमंत्री म्हणाले, कापसावरील बोंडअळीचा फटका राज्यातील २८ जिल्ह्यांना बसला असून तुडतुड्यामुळे सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, जिल्ह्यातील धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने यापूर्वीच ३३७३.३१ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला आहे.
केंद्रीय पथकाचे प्रमुख तथा कृषी विभागाचे सहसचिव अश्विनीकुमार यांनी सांगितले, केंद्रीय पाहणी पथकातील अधिकाऱ्यांनी गटागटाने विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचा दौरा करुन प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, कृषी विद्यापीठातील संशोधन, नैसर्गिक आपत्तीबाबतची पूर्वतयारी तसेच पीक विम्यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याशी चर्चा केली.
या बैठकीला वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यू.पी.एस. मदान, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच केंद्रीय पाहणी पथकातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.