नागपूर/भंडारा:साडेतीन वर्षापूर्वी माजी खासदार पटोले यांच्यासाठी भाजपनेते सर्वात चांगले होते. पण साडेतीन वर्षापूर्वी ते वाईट कसे झाले, हे त्यांनी जनतेला सांगावे, असे आव्हान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी खासदार नाना पटोले यांना दिले.
गोंदिया जिल्ह्यातील ईळदा, दिनकरनगर, महागाव, अरुणनगर भागात भाजपाचे अधिकृत उमेदवार हेमंत पटले यांच्या प्रचारासाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकी आणि मतदारांशी संपर्क करताना ते बोलत होते. ईळदा, दिनकरनगर, महागाव, अरुणनगर हा आदिवासी व दुर्गम भाग असून या भागात बैठकींतून प्रचार करताना बावनकुळे यांनी हा भाग पिंजून काढला.
याप्रसंगी पालकमंत्री बावनकुळे यांच्यासोबत सामाजिक न्यायमंत्री व गोेंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले, काशीम जामा कोशी, श्रीमती रचना गहाणे, अनिल ताराम, कल्पना राऊत, सरपंच नीता धुर्वे, श्रीमती लांजेवार, भेंडारकर, उमाकांत ढेंगे, डॉ. जतीन मंडल, अर्चना राऊत, संतोष सरकार, प्रभाकर गहाणे, तेजूकला गहाणे, रघुनाथ लांजेवार, विनोंद डोंगरवार, रामदास मोहोडकर आदी उपस्थित होते.
येत्या 28 ची निवडणूक ही बदला घेण्यासाठीची निवडणूक असल्याचे सांगून पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- ही निवडणूक जनतेला नको असताना लादली गेली आहे. निवडणूक लादणार्याला धडा कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी धडा शिकवला पाहिजे. आधी भाजपाचे नेते चांगले आहेत, असे म्हणणार्याला आता ते वाईट असल्याचा साक्षात्कार झाला काय, असा सवालही पालकमंत्र्यांनी उपस्थित केला. या बैठकींमध्ये सामाजिक न्यायमंत्री राजकुमार पटोले यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
देवेंद फडणवीस सरकार हे शेतकर्याचे सरकार आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले- 60 वर्षे काँग्रेसने या राज्यावर सत्ता केली. गरिबी हटावचा नारा दिला. पण गरिबी हटली नाही उलट गरीबच हटला. आमचे सरकार फक्त 4 वर्षाचे आहे. 4 वर्षात या सरकारने काँग्रेसच्या 60 वर्षात झाले नसतील एवढी कामे केली आहेत, हे कार्यकर्त्यांनी मतदारांना सांगावे व मतदारांशी घरोघरी जाऊन संपर्क करावा. जास्तीत जास्त मतदान होईल, याकडे कार्यकर्त्यांनी अधिक लक्ष देण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केली.
आदिवासी व दुर्गम भाग असतानाही या बैठकींना मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि गावातील नागरिक महिला उपस्थित होत्या.