नागपूर: २५ मे रोजी दुपारी २.१८ वाजता सूर्य घोडा या वाहनावरून रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे सूर्याने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केल्यावर नवतपाला प्रारंभ होतो. रोहिणी नक्षत्रात सूर्य आणि पृथ्वी यामध्ये असलेले अंतर खूपच कमी होते, त्यामुळे पृथ्वीवर पडणारी सूर्याची किरणे नेहमीपेक्षा अधिक उष्ण असतात. हा नवतपा २ जूनपर्यंत राहणार असल्याचे ज्योतिषतज्ज्ञ डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले. २०१८ च्या ग्रहसंकेतानुसार पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. यावर्षी २२ जूनला सकाळी ११.०८ वाजता सूर्य जेव्हा हत्तीवरून आर्द्र नक्षत्रात प्रवेश करेल तेव्हा पावसाळ््याला प्रारंभ होईल.
२०१८ मध्ये पावसाळ््यात अंदाजे ५५ दिवस पाऊस येणार असून समुद्री वादळ, त्सुनामी, भूकंपासारखे संकट येण्याचे संकेत ग्रह दर्शवित असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले. यावेळी श्रीशके १९४० मध्ये विलंबी नक्षत्राचा राजा सूर्यच असून मंत्री शनिदेव आहे. नवतपाच्या काळात यावेळी इतर वर्षांपेक्षा जास्त उष्णतामान राहील व देशातील काही प्रदेशात वादळी पाऊस येण्याचे भाकीत ग्रहमानावरून करता येईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.