नागपूर: चीनमधील झेंग शू शहरात पर्यटन या विषयावर आधारीत आंतरराष्ट्रीय महापौर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी महापौर नंदा जिचकार शनिवारी (ता. २६) रात्री चीनला रवाना झाल्या. परिषदेत त्या ‘नागपूरच्या शाश्वत विकासात पर्यटन कशी महत्त्वाची भूमिका बजावू शकेल’, याबाबत सादरीकरण करतील.
‘सिटी टुरिझम इनोव्हेशन इन द शेअरिंग इकॉनॉमी’ या संकल्पनेवर सदर परिषद आयोजित करण्यात आली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या जगभरातील शहरांतील महापौर आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे तज्ज्ञ या परिषदेच्या माध्यमातून आपले अनुभव मांडतील. या परिषदेत ‘बेल्ट ॲण्ड रोड’ टुरिजम सिटीज समीट, परिसंवाद, आंतरराष्ट्रीय पर्यटन शहर प्रदर्शन राहील. शाश्वत शहरी विकासात पर्यटन महत्त्वाची भूमिका बजावू शकेल काय, याबाबत विचारमंथन करण्यात येणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून नागपूरच्या पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्याचा प्रयत्न राहील.