मुंबई: पालघर लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या साम, दाम, दंड आणि भेद या शब्दाबाबत केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांची बाजू सावरून घेत म्हणाले, देवेंद्रांना मी लहानपणापासून ओळखतो. ते सुसंस्कृत आहेत. त्यांच्या साम, दाम, दंड व भेदाचा अर्थ सर्व ताकद लावा असा होतो.
शिवसेना-भाजपमध्ये सध्या आलेल्या कमालीच्या कटुतेनंतरही गडकरी यांनी युती टिकावी, अशी भावना व्यक्त केली. केंद्र सरकारच्या चार वर्षे झाल्याच्या निमित्ताने मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सेना-भाजपची स्थिती ‘तुझे माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना’ अशी आहे. आमची युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली आहे आणि ती राहिली पाहिजे,’ असे ते म्हणाले. पेट्रोल-डिझेलचे वाढते दर हा जागतिक घडामोडींचा परिणाम असल्याचं त्यांनी सांगितले.
संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सध्या वादाच्या भोव-यात अडकले आहेत. याबाबत विचारलं असता हा वाद अनाठायी असल्याचं गडकरी यांनी स्पष्ट केले. मुखर्जी यांनी संघाच्या कार्यक्रमाला येण्यात गैर काय,’ असा उलट प्रश्न त्यांनी केला.