मुंबई: उद्योग क्षेत्राच्या भरभराटीसाठी महाराष्ट्र सरकार कायम प्रयत्नशील असून भविष्यात बांगलादेशला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. बांगलादेशचे उप-उच्चायुक्त एम. डी. रहमान यांनी देसाई यांची सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी श्री. देसाई बोलत होते.
महाराष्ट्र उद्योगवाढ, गुंतवणुकीसाठी नंदनवन आहे. मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्र या उपक्रमामुळे जगभरातील विविध कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करत आहेत. दरम्यान लेदर, फॅब्रिक निर्मितीमध्ये बांगलादेश अग्रेसर असून बांगलादेश मॉड्युलचा भारतातील कंपन्या अभ्यास करतील, असे आश्वासन श्री. देसाई यांनी यावेळी दिले.
दरम्यान, भारतातील रिलायन्स, गोदरेज या कंपन्या बांगलादेशमध्ये सक्रिय आहेत. परंतु माहिती-तंत्रज्ञान, साखर व इतर उद्योगांनी देखील बांगलादेशात गुंतवणूक करून आपला विस्तार करावा, अशी अपेक्षा श्री. रहमान यांनी व्यक्त केली.