मुंबई: समांतर आरक्षणाच्या मुद्दय़ावरून सुरू असलेल्या न्यायालयीन प्रकरणामुळे रखडलेला राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल अखेर बुधवारी जाहीर झाला. या परीक्षेत जळगाव येथील रोहितकुमार राजपूत राज्यात प्रथम आला आहे. मुलींमध्ये पुणे येथील रोहिणी नऱ्हे, तर राखीव गटातून सोलापूर येथील अजयकुमार नष्टे हे उमेदवार प्रथम आले आहेत.
गेली दोन- तीन वर्षे पुढील वर्षांच्या पूर्वपरीक्षेपूर्वी आधीच्या वर्षीचा अंतिम निकाल जाहीर करण्याची परंपरा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राखली होती. मात्र यंदा न्यायालयीन प्रकरणामुळे राज्यसेवेसह इतरही परीक्षांचा निकाल रखडला. अखेर न्यायालयाच्या परवानगीनंतर राज्यसेवा २०१७ या परीक्षेचा निकाल आयोगाने जाहीर केला आहे.
उपजिल्हाधिकारी पदाच्या १४ जागांसह एकूण ३७७ जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. पूर्वपरीक्षेसाठी १ लाख ९८ हजार ५९९ बसले होते. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा असे टप्पे पार करून १ हजार १९४ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले.
माध्यम वार्ताहरशी बोलतांना रोहित राजपुत म्हणाला आई-वडिलांच्या गेल्या २५ वर्षांच्या कष्टाचे चीज झाले याचा खूप आनंद आहे. सध्या मी मंत्रालयात कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहे. या पूर्वी २०१५ मध्ये परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. सीओईपीमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. वेळेचे नियोजन आणि सातत्य ठेवून अभ्यास केला.