- पुणे येथील करिअर कौन्सिलर विवेक वेलणकर करणार मार्गदर्शन
- दहावी, बा पदवीनंतरच्या करिअर संधींची होणार ओळख
नागपूर : दहावी, बारावी हे करिअरचे निर्णायक वळण आहे. मात्र, पुरेशा मार्गदर्शनाअभावी पालक आणि विद्यार्थी ठरावीक अभ्यासक्रमांनाच प्राधान्य देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अंगभूत क्षमता सिद्ध करता येत नाही. स्वतःची आवड, क्षमता आणि कौशल्य लक्षात घेऊन करिअरबाबत कोणता निर्णय घ्यायचा, याबाबत मार्गदर्शनासाठी ‘माय करिअर क्लब’ आणि ‘स्वयम’ सामाजिक संस्थेच्या वतीने ‘करिअर वेध’ ही निःशुल्क कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सीताबर्डी येथील रामगोपाल माहेश्वरी सभागृहात शनिवारी (ता. २ जून) सायंकाळी ५.३० वाजता घेण्यात येणाऱ्या या कार्यशाळेत पुणे येथील सुप्रसिद्ध करिअर कौन्सिलर विवेक वेलणकर हे विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करतील.
दहावी-बारावीनंतर काय करणार, असा प्रश्न एखाद्या विद्यार्थ्याला विचारला, तर निकाल लागल्यानंतर बघू, असे सर्वसाधारण उत्तर मिळते. आपल्याला नेमके कशात करिअर करायचे आहे, याचा निर्णय केव्हा घ्यायचा, स्वतःची आवड कशी ओळखायची असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांसमोर समोर निर्माण होतात. आयुष्याच्या या महत्त्वपूर्ण वळणावर योग्य निर्णयाची गरज असते. दहावी-बारावीनंतर कोणत्या निकषांच्या आधारावर विद्याशाखा (फॅकल्टी) निवडायची, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तसेच कोणकोणत्या करिअर संधी आहेत, यशस्वी करिअर घडविण्यासाठी कोणकोणती गुणकौशल्ये हवीत, स्पर्धा परीक्षेतील करिअर आदी विषयांवर कौन्सिलर विवेक वेलणकर माहिती देतील. प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये विद्यार्थी-पालकांना मार्गदर्शकाशी संवाद साधून करिअरसंबंधी शंकांचे निरसन करता येईल.
कार्यशाळेविषयी अधिक माहिती आणि नावनोंदणीकरिता ९०४९७६३८४९ किंवा ७७२००५०२४५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. कार्यशाळेला विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माय करिअर क्लबचे संस्थापक आणि स्वयम् सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विशाल विलासराव मुत्तेमवार यांनी केले आहे.