नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मच्छीसाथ येथे बांधण्यात येत असलेल्या मटन मार्केटचे काम वर्षभरापासून रखडले आहे. प्रशासकीय स्तरावर अडलेल्या ह्या कामातील अडचणी तातडीने दूर करा, असे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले.
मच्छीसाथ येथील मटन मार्केटच्या बांधकामात असलेल्या अडचणी आणि त्यावरील उपायांच्या चर्चेसाठी शुक्रवारी (ता. १) महापौर कक्षात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांच्यासह मनपातील प्रतोद दिव्या धुरडे, उपायुक्त राजेश मोहिते, तांत्रिक सल्लागार विजय बनगीरवार, मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, सहायक आयुक्त (बाजार) विजय हुमणे, कंत्राटदार अमित कावळे उपस्थित होते.
यावेळी कार्यकारी अभियंता राजेश भूतकर यांनी मटन मार्केटच्या बांधकामासंदर्भातील माहिती दिली. सदर कामाच्या निविदा सन २०१३ मध्ये निघाल्या होत्या. सन २०१६ मध्ये कार्यादेश मिळाल्यानंतर बांधकाम सुरू झाले. मटन मार्केटच्या बेसिक इमारतीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, मार्केट लगत असलेल्या कत्तलखान्याचाही विस्तार करायचा असल्याने सदर बांधकामाचे नव्याने अंदाजपत्रक तयार करण्यात आले. पूर्वी या प्रकल्पाची किंमत ९० लाख होती. नव्या अंदाजपत्रकानंतर वाढीव ४० लाख अपेक्षित आहे. ह्या प्रोव्हीजनसाठी काम थांबले असल्याचे भूतकर यांनी सांगितले. बेसिक इमारतीमध्ये पाणी कनेक्शन, ड्रेनेजचे काम झाले की आत व्यावसायिकांना बसता येईल, असेही भूतकर यांनी सांगितले.
कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर ह्यांनी रखडलेल्या कामावर तीव्र नापसंती व्यक्त केली. बजेटमध्ये प्रोव्हीजन असताना काम लांबणे, हे योग्य नाही. याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असती तर मार्ग निघाला असता. मात्र, अधिकाऱ्यांनी कुठलीही हालचाल केली नाही. आता तातडीने पुढील आठ दिवसांत सर्व अडचणी दूर करून काम तातडीने सुरू करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
शनिवारी २ जून रोजी सकाळी १० वाजता मटन मार्केटच्या प्रत्यक्ष बांधकामाची स्थिती बघण्यासाठी आपण स्वत: दौरा करणार असल्याची माहिती कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिली.