नागपूर: नागपूर शहरातील मानेवाडा घाट आणि दिघोरी घाटावरील सोयीसुविधा वाढविण्यात याव्या. सौंदर्यीकरण अजून वेगाने करण्यात यावे. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने योग्य त्या माहितीदर्शक पाट्या लावण्यात याव्या, असे निर्देश आमदार सुधाकर कोहळे यांनी दिले.
यावेळी त्यांच्यासमवेत मनपाच्या स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, हनुमाननगर झोनच्या सभापती रूपाली ठाकूर, नेहरूनगर झोनच्या सभापती रिता मुळे, नगरसेविका मंगला खेकरे, माधुरी ठाकरे, स्नेहल बिहारे, नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, उपविभागीय अभियंता कृष्णकुमार हेडाऊ, रक्षमवार उपस्थित होते.
प्रारंभी आमदार सुधाकर कोहळे यांनी मानेवाडा घाटाची पाहणी केली. घाटावर गार्डनींगचे शिल्लक असलेले काम तातडीने पूर्ण करा, घाटावर असलेल्या झाडांभोवती ओटे तयार करा जेणेकरून आगंतुकांना तेथे बसता येईल, दफनभूमीवर कम्पाऊंड तयार करा, घाटावर उघड्यावर असलेले इलेक्ट्रीक केबल विद्युत विभागाच्या सहकार्याने व्यवस्थित करा, पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्यात यावी, एलपीजी दहन व्यवस्थेचे बांधकाम लवकरात लवकर करण्यात यावे, घाटावरील अस्थी ठेवण्याच्या जागेवर योग्य सुविधा पुरवण्यात याव्यात, घाटाच्या पार्किंगमध्ये असलेले पथदिवे मध्यभागी लावण्यात यावे, घाटाच्या गेटवरील अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे, घाटावर लाकडांचा आणि गोवऱ्यांचा मुबलक पुरवठा असावा, एका मृतदेहासाठी किती लाकडे देण्यात येतात याबाबत तसेच शव वाहिन्या, शीत पेटी, झोनल अधिकारी आदींचे मोबाईल क्रमांक असलेल्या पाट्या लावण्याचे निर्देश त्यांनी दिले.
दिघोरी घाटावर असलेल्या अस्वच्छतेबद्दल आमदार सुधाकर कोहळे आणि सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी नाराजी व्यक्त केली. घाट स्वच्छ करण्यात यावा आणि तातडीने गार्डनिंगचे काम सुरू करण्याचे निर्देश आ. कोहळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यानंतर त्यांनी बिडीपेठ येथील आशीर्वाद नगर बाजार आणि नासुप्रच्या इंदिरा गांधी सभागृहाचीही पाहणी केली. त्याननतर बुधवार बाजार येथील प्रस्तावित भाजी मार्केटच्या जागेची पाहणी केली. या प्रकल्पांसंदर्भात आवश्यक ते निर्देश त्यांनी यावेळी दिले.