ठाणे: मुंबई उपनगर, नवी मुंबई आणि ठाण्यातील अनेक भागात विजेचा लपंडाव सुरु आहे. वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी हा पूर्ण आठवडा जाणार आहे, तर युनिट-2 दुरुस्त करण्यासाठी 30 ते 40 दिवसांचा कालावधी लागणार आहे.
दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. युनिट-1 कार्यरत करण्यासाठी साधारणपणे सात दिवसांचा, तर युनिट-2 कार्यरत करण्यासाठी 30 ते 40 दिवसांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती देण्यात आली आहे.
‘महापारेषण’च्या कळवा येथील 400/200 kv EHV सब स्टेशनमध्ये काल (गुरुवारी) रात्री तांत्रिक बिघाड झाला. या केंद्रातून ‘महावितरण’च्या भांडुप नागरी परिमंडळातील ठाणे मंडळाअंतर्गत नवपाडा, कोपरी, विटावा, कळवा, मुलुंड (पूर्व आणि पश्चिम) या परिसरात, तर वाशी मंडळाअंतर्गत वाशी, ऐरोली, घणसोली, रबाळे, ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत, तुर्भे MIDC, कोपरखैरणे, बोनकोडे या परिसरात वीज पुरवठा होतो.
सध्या या सर्व परिसराची वीज मागणी आणि पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याचा महावितरणमार्फत आटोकाट प्रयत्न सुरु आहे. विजेची मागणी वाढल्यास सध्या चालू असलेल्या यंत्रणेवर अधिकचा भार येऊन बिघाड होण्याची शक्यता असते. म्हणूनच मागणी आणि पुरवठा यांचा ताळेबंद साधण्याकरता महापारेषण आणि महावितरणला विजेचं नियोजन करावं लागणार आहे. या काळात आवश्यकतेनुसार ठराविक वेळेनुसार काही भागात विजेचे नियोजन केल्यामुळे वीज पुरवठ्यात व्यत्यय येऊ शकतो.
या कालावधीत वरील परिसरातील ग्राहकांनी विजेचा वापर जपून करावा, तसेच तांत्रिक कारणाने उद्भवलेल्या अडचणीच्या प्रसंगी महावितरण व महापारेषणला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.