पुणे: स्वामिनाथन आयोग तुमच्या काळात आला होता, एवढ्या वर्ष तुम्ही तो का लागू केला नाही? असा प्रश्न राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेत उपस्तिथ केला. त्याचबरोबर शेतकऱ्यांना चिथावणी देण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही, असेही ते म्हणाले. सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यांची तशी नियतही दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबत टोकाची भूमिका घेऊन आंदोलन तीव्र करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईत केले होते.
‘सौ चुहे खा के बिल्ली हज को चली’ अशा शब्दात राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. पाशा पटेल पुण्यात बोलत होते.
पवार कृषिमंत्री असतानाच्या काळातील चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तसेच 2022 पर्यंत शेतकऱ्यांना उत्पादन खर्च आणि 50 टक्के नफा देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ती ते पूर्ण करतील. अशी हमी सुद्धा पटेल यांनी यावेळी दिली.
पटेल म्हणाले, शरद पवार कृषी मंत्री असताना चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी शेतकरी एका हाकेत रस्त्यावर उतरत होते. तळहातावर केस येईपर्यंतची भाषा करणाऱ्यांनी 10 वर्ष स्वामिनाथन आयोग समोर असताना तो लागू केला नाही. आधीच्या सरकारने जे 40 वर्षात शेतकऱ्यांसाठी केले नाही ते मोदी सरकार 4 वर्षात करत आहे, असेही पटेल म्हणाले.