पुणे : ज्यांना राजकारणात कुठलाही भाव देत नाही असे काही नेते प्रसिद्धीसाठी शरद पवारांवर आरोप करत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या ५० वर्षाच्या इतिहासात शरद पवार यांच्यावर जोपर्यंत टीका केली जात नाही, तोपर्यंत प्रसिद्धी मिळत नाही, हे सत्य आहे. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पाशा पटेल आणि प्रकाश आंबडेकर यांच्यावरटीकास्त्र सोडले आहे.
शेतमाल आणि दुधाला योग्य दर मिळत नसल्याचा विरोध करण्यासाठी राज्याचा शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरु आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी काल शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठींबा देत टोकाची भूमिका घेण्याशिवाय पर्याय नसल्याची भूमिका मांडली. त्यावर पाशा पटेल आणि प्रकाश आंबडेकर यांनी सडकून टीका केली होती. याच प्रश्नावर सुप्रिया सुळे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्या म्हणाल्या की, राज्यातील शेतकरी संपावर गेले असताना सरकारने लवकरात लवकर योग्य पाऊले उचलण्याची गरज आहे, सर्व परिस्थितीची जबाबदारी स्वीकारण्याची सरकारला आवश्यकता होती. मात्र, तसे होताना दिसत नाही अशी खंत त्यानी व्यक्त केली. तसेच शेतकऱ्यांनी अन्न वाया घालवू नये असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
प्रसिद्ध सिनेअभिनेत्री रवीना टंडन हिने शेतकऱ्यांबद्दल केलेल्या ट्विटविषयी विचारले असता, त्या म्हणाल्या की, एखाद्या महिलेने गरीब शेतकऱ्याविषयी असे विधान करून त्यांची चेष्ठा केली आहे. हे पाहून अत्यत दुःख झाले असून सरकारची किती लांगूलचालन करायची हे रवीना टंडन यांच्या विधानातून दिसत आहे, अशा शब्दात रविना टंडन यांना सुप्रिया सुळे यांनी सुनावले.
शिक्षक उपोषणास बसणे ही दुर्दैवाची बाब असून त्यावर हे सरकार कोणत्याही प्रकारची कार्यवाही करताना दिसत आहे. या शिक्षकांनी मुख्यमंत्र्याना देखील अनेक वेळा पत्रव्यवहार देखील केला आहे. लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आम्ही आत्महत्या करण्याचा इशारा देणारे निवेदन देखील देण्यात आले आहे. हे निवेदन घेताना मुख्यमंत्री फोटो काढतात, यासारखी दुसरी वाईट गोष्टी नसल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी शिक्षणात तरी राजकारण आणू नका आणि शिक्षकाचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.