Published On : Fri, Jul 6th, 2018

मनपा पदाधिकारी, प्रशासनाचे युद्धपातळीवर मदतकार्य

नागपूर : नागपूर शहरात गुरुवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण शहरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांसह मनपा आयुक्त आणि संपूर्ण प्रशासन युद्धपातळीवर मदतकार्याला भिडले आहे. आवश्यक तेथे आपतकालिन यंत्रणा सहकार्यासाठी पोहचत असून संपूर्ण यंत्रणा दिवसरात्र कामाला लागली आहे.

आज (ता. ६) सकाळी महापौर नंदा जिचकार यांनी तातडीची बैठक घेऊन संपूर्ण यंत्रणा पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कामाला लावण्याचे निर्देश दिले. बैठकीनंतर महापौर नंदा जिचकार, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल यांनी मनपा मुख्यालयातील ‘सिटी ऑपरेशन सेंटर’मध्ये बसून संपूर्ण नागपूर शहराची माहिती घेतली. आवश्यक तेथे तातडीने मदतकार्य पोहचविण्याचे निर्देश त्यांनी दिले. याचवेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी नागपूरच्या जनतेसाठी सतर्क राहण्याचा संदेशही दिला.

Gold Rate
Tuesday 28 Jan. 2025
Gold 24 KT 80,300 /-
Gold 22 KT 74,700 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यानंतर महापौर नंदा जिचकार यांनी हॉटेल प्राईडसमोरील परिस्थितीची पाहणी केली. तेथे सुरू असलेल्या मदतकार्याचा वेग वाढविण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांच्यासोबत उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखने उपस्थित होत्या. यानंतर त्यांनी पोहरा नदी, प्रभाग ३७ मधील शास्त्री नगर ले-आऊट, दीनदयाल नगर, उरवेला कॉलनी आदी भागातील परिस्थितीची पाहणी केली. घरात पाणी शिरलेल्या कुटुंबीयांनी आपल्या समस्या महापौर नंदा जिचकार यांच्याजवळ सांगितल्या. याचवेळी जेथे आवश्यक तेथे संपूर्ण मदत पोहचविण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

स्थायी समिती सभापतींनी केली गोरेवाडा तलावाची पाहणी

स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी ही शहरातील विविध भागातील परिस्थितीची पाहणी केली. गोरेवाडा तलाव धोक्याच्या रेषेच्या केवळ एक फूट खाली आहे. रात्री तलाव पूर्णपणे भरणार असून त्यामुळे निर्माण होणारा धोका ओळखून तेथेही त्यांनी भेट दिली. उद्‌भवणाऱ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना प्रशासनाला दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत जलप्रदाय समितीच्या उपसभापती श्रद्धा पाठक, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरिश राऊत, ओसीडब्ल्यूचे प्लान्ट मॅनेजर डॉ. ठाकरे उपस्थित होते.

यानंतर त्यांनी उत्तर नागपुरातील बेझनबाग, जरिपटका भागातील पाणी शिरलेल्या वस्त्यांना भेटी दिल्या. तेथे आवश्यक ते मदतकार्य पोहचविण्याचे आवाहन केले. यशवंत स्टेडियमजवळील काही दुकानांत पाणी शिरल्याचे माहिती होताच त्यांनी अग्निशमन यंत्रणेला पाचारण करून मदत पोहचविली. नागपूर महानगरपालिकेची यंत्रणा सतत मदतकार्य करीत आहेच. परंतु ज्या चेंबरमध्ये प्लास्टिक, पॉलिथिन अटकले आहे आणि तेथील पाण्याचा निचरा होत नाही अशा ठिकाणच्या प्लास्टिक पिशव्या नागरिकांनी कर्तव्य म्हणून स्वत: हटविण्याचे आवाहन त्यांनी केले.

आपत्ती निवारण यंत्रणा जुटली मदतकार्यात

नागपूर महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मदतकार्यात लागली आहे. गंभीर परिस्थितीची माहिती प्राप्त होताच तेथे तातडीने यंत्रणा मदत कार्यासाठी पोहचत आहे. अग्निशमन यंत्रणाही पूर्णपणे सज्ज आहे. आपातकालिन परिस्थितीतमध्ये आपातकालिन नियंत्रण कक्षाला संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी संपर्क क्रमांक १०१, ०७१२-२५६७७७७, २५६७०२९,२०३११०१, २५५१८६६ असे आहेत. आपातकालिन मोबाईल क्रमांक ७०३०९७२२०० असा आहे.

Advertisement