मुंबई:सुप्रसिद्ध बाइक रेसर आणि महिला मोटर सायकल प्रशिक्षक चेतना पंडित हिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. मंगळवारी रात्री ही घटना उघडकीस आली. चेतनाच्या घरात सुसाइड नोट सापडली असून दिंडोशी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
माहितीनुसार,
२५ वर्षीय चेतना पंडित गोरेगाव पूर्वेला तीन मैत्रिणींसह भाड्याने राहत होती. मंगळवार दुपारपासून तिच्या घराचा दरवाजा बंद होता. खूप वेळ दरवाजा बंद असल्यानं शेजाऱ्यांना संशय आला. संध्याकाळी शेजारी दार ढकलून आत गेले असता त्यांना चेतना मृतावस्थेत आढळून आली.
‘माझ्या महत्त्वाकांक्षा पू्र्ण करता न आल्यामुळे मी आत्महत्या करते आहे,’ असं तिनं सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे. चेतनाच्या मागे तिचा एकुलता एक भाऊ आहे. सुसाइड नोटमध्ये तिनं भावाची माफीही मागितली आहे. पोलिसांनी या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
महाविद्यालयीन दिवसांपासूनच चेतनाला बाइकचे आकर्षण होते. मुलींना मोटर सायकल शिकवतानाचे, रॉयल एन्फिल्ड चालवतानाचे त्यांचे अनेक व्हिडिओही व्हायरल झाले होते. अनेक मोटारसायकल शर्यतींमध्ये त्यांनी सहभागही घेतला होता. मुंबईतील अनेक महिलांना तिने बाइक चालवायला शिकवली होती.