ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसराला रात्री साडेनऊच्या सुमारास २.८ रिश्टर स्केल इतक्या भूकंपाचे धक्के बसले. कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळ्यासह कल्याणजवळील ग्रामीण भागात हे हादरे बसल्याची माहिती समोर येत आहे.
रात्री ९ वाजून ३१ मिनिटांच्या सुमारास कल्याण डोंबिवली परिसरात अचानक कंपनं आणि हादरे बसण्यास सुरुवात झाली. साधारणपणे ९ वाजून ३३ मिनिटांपर्यंत म्हणजेच सुमारे २ ते ३ मिनिटं हे हादरे जाणवल्याची माहिती कल्याण डोंबिवलीतील अनेक नागरिकांनी एलएनएनला दिली.
अचानक बसलेल्या या हादऱ्यांनी कल्याणच्या अनेक भागात नागरिक घाबरून घराबाहेर जमा झाले. तर हादऱ्यांमुळे काही जणांच्या घरातील भांडी पडल्याची माहितीही प्रत्यक्षदर्शीनी दिली.
याबाबत ठाणे जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधला असता या हादऱ्यांबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर हे भूकंपाचे धक्के असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले.