Mumbai : शेतकरी भाजीपाला व दूध रस्त्यावर आणून फेकतोय तो काय खुशीने? नाणार रिफायनरी व बुलेट ट्रेनसाठी सरकारचा जो ‘हट्ट’ दिसतो तो दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देताना कोठे जातो? शेतकऱ्याने दूध रस्त्यावर फेकल्याचे दुःख ज्यांना होतेय त्यांची वेदना आत्महत्या करणारे शेतकरी व त्यांच्या बेसहारा कुटुंबीयांच्या बाबतीत कोठे गहाण पडते? देशाचे अर्थशास्त्र कोसळले आहे. शेतकरी जमात नष्ट होत आहे.
राजू शेट्टी हे कालपर्यंत मोदी व फडणवीस सरकारचे निष्ठावंत वारकरीच होते. आज त्यांनी ‘एनडीए’ सोडले म्हणून ते लगेच शेतकरीविरोधक झाले काय? भंडारा-गोंदियातील पोटनिवडणुकीत भाजपचा झालेला पराभव हा शेतकऱ्यांनी केलेला पराभव आहे व पालघरात जेमतेम मिळवलेला विजय कुचकामी आहे. चला, त्या बुलेट ट्रेनलाच दुग्धस्नान घालूया! अशी खोचक टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामानातील संपादकीयेमध्ये भाजपावर केली आहे.
आजचा सामना संपादकीय….
महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे व रस्त्यांना दुधाची आंघोळ घालण्याचे प्रकार अनेक ठिकाणी सुरू झाले आहेत. हे आंदोलन राजू शेट्टी यांनी उभे केले आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. शेतकऱ्यास जात आणि धर्म नसतो तसा राजकीय पक्षही नसतो. गेल्या चारेक वर्षांत तीनेक हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या व त्यातील बहुसंख्य मृत शेतकरी व कुटुंबीयांनी मोदी यांनाच मत दिले आहे, पण भ्रमनिरास झाल्यामुळे त्यांना मरण पत्करावे लागले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे. गेल्या वर्षी राज्यातील शेतकऱ्यांना संपावर जावे लागले ही राज्यकर्त्यांची नामुष्की आहे.
आता दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जे आंदोलन केले आहे ते दडपण्यापेक्षा दूध उत्पादकांना दिलासा देता येईल काय? यावर विचार करावा लागेल. दुधाला लिटरमागे पाच रुपये अनुदान द्यावे यासाठी हे आंदोलन आहे. मुंबईसारख्या शहराचा दूधपुरवठा तोडू व कोंडी करू अशी गर्जना राजू शेट्टी यांनी केली आहे. फक्त मुंबईचा दूधपुरवठा तोडून काय होणार? शहरी लोक आजकाल बिनदुधाचा चहा पिण्यावर भर देत आहेत व चहाचे अनेक श्रीमंती प्रकार बाजारात असून दुधाशिवाय त्यांचा आनंद घेतला जातो.
दुधाचा प्रश्न फक्त मुंबई-पुण्यापुरता मर्यादित न ठेवता तो वेगळय़ा मार्गाने सोडवावा यासाठी आम्ही हे सांगत आहोत. स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक नेत्यांनी अनेक गोष्टींचा त्याग केला. त्याप्रमाणे सध्याचे नवे ‘स्वातंत्र्यवीर’ हे जनतेला दूधदुभत्याचा त्याग करायला सांगतील. कारण शेवटी त्याग हा जनतेने व त्यांच्या मुला-बाळांनीच करायचा असतो.
मुंबईचा दूधपुरवठा बंद केला तरी काही फरक पडणार नाही अशी भूमिका सरकारने घेतली आहे. म्हणजे मंत्रालयातील किंवा राज्यकर्त्या पक्षातील ‘रेडय़ां’चे दूध ते उपलब्ध करून देणार आहेत. थोडक्यात असे की, सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढेल व ‘जय किसान’चा नारा देत विजय दिवस साजरा करील. राज्य सरकारने गाईच्या दुधाचा खरेदी दर लिटरला २७ रुपये ठरवला आहे. मात्र सध्या १६ ते १८ रुपये प्रतिलिटरने दुधाची खरेदी होत आहे. सरकारने जो दर ठरवलाय त्या दराने दुधाची खरेदी होत नाही. जसे कर्जमाफीची घोषणा करूनही शेतकऱ्यांचे कर्ज माफ होऊ शकले नाही, तीच गत दूध दराचीही आहे.
गोवा, कर्नाटक सरकार शेतकऱ्यांना लिटरला पाच रुपयांचे अनुदान देते. महाराष्ट्र सरकारनेही किमान तेवढे तरी अनुदान द्यावे अशी मागणी शेतकरी करीत असतील तर त्यांचे काय चुकले? सरकार बुलेट ट्रेन, हायस्पीड ट्रेन, समृद्धी महामार्ग, मेट्रोसाठी हजारो कोटी रुपये देत आहे, कर्ज काढून ‘बुलेट ट्रेन’ची दिवाळी साजरी करीत आहे, पण दूध उत्पादकांना पाच रुपये अनुदान देत नाही. शेतकऱ्यांच्या मालास दीडपट हमीभावाची घोषणा मोदी सरकारने केली. त्यात महाराष्ट्रातील शेतकरी येत नाही काय, हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले पाहिजे.
विरोधी पक्षाची धोरणे शेतकरीविरोधी असल्याची तोफ श्री. मोदी यांनी कालच डागली आहे, पण देशात व अनेक राज्यांत विरोधी पक्षांचे राज्य नाही. हे लक्षात घेतले पाहिजे. राजू शेट्टी हे कालपर्यंत मोदी व फडणवीस सरकारचे निष्ठावंत वारकरीच होते. आज त्यांनी ‘एनडीए’ सोडले म्हणून ते लगेच शेतकरीविरोधक झाले काय? भंडारा-गोंदियातील पोटनिवडणुकीत भाजपचा झालेला पराभव हा शेतकऱ्यांनी केलेला पराभव आहे व पालघरात जेमतेम मिळवलेला विजय कुचकामी आहे.
शेतकऱ्यांनी भाजपास मोठय़ा आशेने मतदान केले. तो सर्वच स्तरांवरील शेतकरी आज खचला आहे. भाज्या, दूध, ऊस, डाळिंब, कापूस पिकवणारा शेतकरी मरणाला सामोरा जात आहे. देशात मध्यंतरी पेट्रोलचे दर नव्वदीच्या उंबरठय़ावर पोहोचले होते. डिझेलच्या दरातही विक्रमी वाढ झाली होती. तरीही सामान्य माणसाने ती सहन केली. त्याविरुद्ध त्याचा भडका उडाला नाही. आता दूध उत्पादकांची दूध दरवाढीची मागणी फक्त पाच रुपयांची दिसत असली तरी ती त्यांच्यासाठी जीवनमरणाची लढाई आहे.
त्यामुळेच त्या पाच रुपयांसाठी त्याचा भडका उडाला आहे, तो रस्त्यावर उतरला आहे. शेतकरी भाजीपाला व दूध रस्त्यावर आणून फेकतोय तो काय खुशीने? नाणार रिफायनरी व बुलेट ट्रेनसाठी सरकारचा जो ‘हट्ट’ दिसतो तो दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देताना कोठे जातो? शेतकऱ्याने दूध रस्त्यावर फेकल्याचे दुःख ज्यांना होतेय त्यांची वेदना आत्महत्या करणारे शेतकरी व त्यांच्या बेसहारा कुटुंबीयांच्या बाबतीत कोठे गहाण पडते? देशाचे अर्थशास्त्र कोसळले आहे. शेतकरी जमात नष्ट होत आहे. चला, त्या बुलेट ट्रेनलाच दुग्धस्नान घालूया!. असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.