नागपूर : राज्य सरकारने नगरपरिषद, महानगरपालिका व संबंधित नियोजन प्राधिकरणे यांच्याकडील इमारतीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या विविध परवानगी प्रकरणात एकसुत्रता आणण्यासाठी अद्ययावत ‘बिल्डींग प्लान मॅनेजमेंट सिस्टीम’ (बीपीएमएस) पोर्टल तयार करण्यात आले आहे.
हे पोर्टल येत्या २५ जुलैपासून नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात येणार आहे. शनिवारी (ता. २१) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात महापौर नंदा जिचकार यांच्या प्रमुख उपस्थितीत बीपीएमएस पोर्टलच्या विस्तृत माहितीचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, सहायक संचालक (नगररचना) प्रमोद गावंडे, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, प्रमुख उपअभियंता श्रीकांत देशपांडे आदींच्या उपस्थितीत बीपीएमएस पोर्टलच्या विस्तृत माहितीचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी शहरातील वास्तुतंत्र, वास्तुशिल्पी, सिव्हील इंजिनियर, सुपरवायजर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या बीपीएमएस पोर्टलमुळे इमारत बांधकाम परवानगीचे कार्य अधिक सुलभ होणार आहे. शहरातील वास्तुतंत्र, वास्तुशिल्पी, सिव्हील इंजिनियर, सुपरवायजर यांना अगोदर बीपीएमएस पोर्टल अथवा राज्यशासनाच्या ‘महावास्तू’ या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागणार आहेत.
त्याची पडताळणीही ऑनलाईन पद्धतीनेच मनपातील लिपिकाकडून त्यावर शेरा देतील. यानंतर इमारत बांधकाम परवानगी संदर्भातील पुढील प्रक्रिया करता येणार आहे.
या संपूर्ण प्रक्रियेमुळे सर्वांचेच काम सुलभ होणार असून वेळेची बचत होणार आहे. विशेष म्हणजे परवानगीसाठी अनेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या फाईलच्या मन:स्तापासून सुटका मिळणार आहे.