मुंबई : गेल्या महिन्यात दूध आंदोलन पेटल्यानंतर राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात १९ जुलै रोजी दुधाला २५ रुपये प्रति लिटरचा दर जाहीर केला होता. मात्र तांत्रिक अडचणींमुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. त्यामुळं शेतकऱ्यांच्या दुधाला आतापर्यंत १५ ते २० रुपयेच दर मिळत होता. आजपासून अखेर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. आजपासून दूध उत्पादकांना लिटरमागे २५ रुपयांचा दर मिळणार आहे.
दूध उत्पादकांना गाईच्या दुधाला प्रति लिटर २५ रुपये दर देण्य़ाची तयारी सहकारी आणि खासगी दूध संघांनी दर्शविली असून राज्य शासन आणि दूध संघांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत मंगळवारी यावर शिक्कामोर्तब झाले. जे दूध संघ २५ रुपये दर देणार नाहीत अशांवर यापुढे कारवाई अटळ असल्याचा इशाराही राज्य शासनाकडून देण्यात आला आहे. अनुदानासाठी दुधाच्या गुणवत्तेची अट ३.२ फॅट आणि ८.३ एसएनएफ अशी शिथील करण्याचा निर्णय घेण्यासही सरकारने यावेळी मान्यता दिल्याचे सांगण्यात आले.
शेतक ऱ्यांच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ झाल्याच्या पाश्र्वभूमीवर ‘गोकुळ’ने आज आपल्या गाय आणि म्हशीच्या दूध विक्री किमतीत २ रुपयांची वाढ केली आहे. यापुढे ‘गोकुळ’च्या गायीच्या दुधाची ग्राहकांसाठी विक्री किंमत ही ४५ रुपये, तर म्हशीच्या दुधाची विक्री किंमत ही ५६ रुपये लीटर अशी राहणार असल्याचे संघाच्या वतीने कळविण्यात आले आहे. हे नवे दर उद्यापासून लागू होणार आहे.