नागपूर: नागपूर महानगपालिकेच्या वतीने आयोजित वंदे मातरम् समूहगान स्पर्धा हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची रुजवणूक करणारा आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात देशाविषयी आदर व प्रेमाची भावना निर्माण होईल. १९९६ पासून सलग २२ वर्षे निरंतर सुरू असलेल्या या उपक्रमाने देशात नागपूरची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मनपाकडून २२ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम राष्ट्रप्रेमाची भावना जागविणारा प्रेरणादायी उपक्रम आहे, असे प्रतिपादन मनपा शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित वंदे मातरम् समूहगान स्पर्धेचे शुक्रवारी (ता. १०) सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघ येथील सभागृहात थाटात उद्घाटन झाले. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी मनपा क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, जितेंद्र गायकवाड, संजय भुरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री. दिवे म्हणाले, २२ वर्षापूर्वी १९९६ ला तत्कालिन महापौर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंदे मातरम् समूहगान स्पर्धेची सुरूवात केली. आज या स्पर्धेने मोठी उंची गाठली असून शहरातील शंभरावर शाळा दरवर्षी यामध्ये सहभागी होत आहेत. याचे सर्व श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असून या उपक्रमाबद्दल महानरपालिका त्यांची आभारी आहे, अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
इयत्ता ६ ते ८ वी, ९ ते १० वी व पहिली ते पाचवी अशा तीन गटात ही स्पर्धा होणार असून शुक्रवारी (ता. १०) इयत्ता ६ वी ते ८वी च्या विद्यार्थ्यांची प्राथमिक फेरी झाली. यानंतर ११ ऑगस्टला इयत्ता ९ ते १०वी तर १३ ऑगस्टला पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची फेरी होणार आहे.
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी शहरातील मनपा व इतर अशा सुमारे ४८ शाळांनी सहभाग घेतला. तिन्ही गटातून सुमारे शंभरावर शाळा स्पर्धेमध्ये सहभागी होतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली. १४ ऑगस्टला रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. प्राथमिक फेरीमधून तिन्ही गटातील प्रत्येकी चार संघांची अंतिम फेरीसाठी निवड होईल. यामध्ये पहिल्या चार विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. याशिवाय दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांना विशेष पुरस्कारानेही गौरविण्यात येणार आहे.