Published On : Fri, Aug 10th, 2018

लघुउद्योगाची कास धरा, सक्षम व्हा!

नागपूर : महिलांच्या संदर्भातील ‘चूल आणि मूल’ ही संकल्पना बदलली आहे. प्रत्येक महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून संसाराला आर्थिक हातभार लावत आहे. महिलांना लघु उद्योगाचे महत्त्व कळले. आपण सक्षम बना. अन्य महिलांनाही लघु उद्योगाचे महत्त्व सांगा. लघु उद्योगाची कास धरा आणि यशाची शिखरे पादाक्रांत करा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग तसेच महिला व बालकल्याण समितीच्या वतीने ‘चलो चले प्रगति की ओर’ या झोननिहाय अभियानांतर्गत शुक्रवारी (ता. १०) लक्ष्मीनगर झोनअंतर्गत सावरकर चौकातील पराते सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात त्या उद्‌घाटक म्हणून बोलत होत्या. मंचावर महिला व बालकल्याण सभापती प्रगती पाटील, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती विशाखा मोहोड, नगरसेविका वनिता दांडेकर, ॲड. मिनाक्षी तेलगोटे, पल्लवी श्यामकुळे, सोनाली कडू, जयश्री वाडीभस्मे, मिटकॉनचे ज्ञानेश्वर चौधरी, लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखने उपस्थित होते.

Gold Rate
Thursday 06 Feb. 2025
Gold 24 KT 84,900 /-
Gold 22 KT 79,000 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, मनपाच्या महिला व बालकल्याण समितीने ‘चलो चले प्रगति की ओर’ या अभियानाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने चांगले पाऊल टाकले आहे. या अभियानाच्या निमित्ताने अनेक महिला विविध उपक्रमांशी जुळल्या जाऊ लागल्या आहेत. आतापर्यंत ज्या-ज्या झोनमध्ये मेळावे झालेत, त्या मेळाव्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. याचाच अर्थ महिलांना उद्योगाकडे वळायचे आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन हवे आहे. या अभियानाच्या माध्यमातून महिलांना योग मार्गदर्शन मिळत असून दिशा देण्याचे यशस्वी कार्य सुरू असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

‘उठ भगिनी जागी हो…लघु उद्योगाचा धागा हो’ : प्रगती पाटील

महिला व बालकल्याण सभापती प्रगती पाटील म्हणाल्या, आजच्या आधुनिक युगात महिला पुरूषांच्या बरोबरीने वाटचाल करीत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या महिलांमध्ये गृहिणींचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी, समाजात सन्मानाचे स्थान मिळविण्यासाठी आता एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांच्या उत्थानासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची पूरेपूर माहिती घेउन त्याच्या अंमलबजावणीसाठी कशी करावी, शिवाय बँकांकडून आर्थिक सहकार्य कसे मिळविता येईल याची माहिती एकत्रितरित्या मिळावी, यासाठी प्रत्येक झोनमध्ये अभियानाची ओळख करून देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. स्वयं सक्षमीकरणासाठी महिलांनी पुढाकार घेत अभियानात सहभागी व्‍हावे, असे आवाहन करीत ‘उठ भगिनी जागी हो…लघु उद्योगाचा धागा हो’ असा संदेश महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांनी यावेळी केले.

महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती विशाखा मोहोड यांनी राशन कार्डचे महत्त्व आणि त्यामाध्यमातून शासकीय योजनांचा मिळणारा फायदा याबद्दल महिलांना माहिती दिली. मिटकॉनचे ज्ञानेश्वर चौधरी यांनी लघु उद्योगासाठी आवश्यक गोष्टींची माहिती आणि महिलांनी लघु उद्योगांकडे कसे वळावे, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. लक्ष्मीनगर झोनचे सभापती प्रकाश भोयर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन कविता खोब्रागडे यांनी केले. आभार लक्ष्मीनगर झोनच्या समुदाय संघटक ज्योती शेगोकार यांनी मानले. मेळाव्यात उद्योगाची आणि त्यासाठी आवश्यक प्रशिक्षणाची माहिती देणारे विविध स्टॉल्स लावण्यात आले होते. स्वच्छ नागपूर, वॅरॉसिटी, मेगासॉफ्ट, नुपूर, अंजना बहुउद्देशीय संस्था, आधार समुपदेशन केंद्र आदी स्टॉलवरून महिलांना विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. मेळाव्याला महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

Advertisement