भारताचे माजी पंतप्रधान भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आपले सर्व कार्यक्रम रद्द करून राज्यपाल दिल्लीला रवाना होत आहेत.
“स्वतंत्र्योत्तर भारताच्या राजकीय जीवनात तसेच लोकमानसावर अनेक दशके अधिराज्य गाजविणारे अटल बिहारी वाजपेयी हे देशातील उत्तुंग प्रतिभा लाभलेले शालीन व्यक्तिमत्व होते.
ते एक परिपूर्ण संसदपटू, द्रष्टे मुत्सद्दी, अमोघ वक्ते तसेच सुहृद व्यक्ती होते.
वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारताने एक महासत्ता म्हणून आपला न्याय्य हक्क जगापुढे जोरकसपणे मांडला”, असे अटल बिहारी यांच्या मंत्रिमंडळात गृह, उद्योग व वाणिज्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम केले असलेल्या विदयासागर राव यांनी आपल्या शोकसंदेशमध्ये म्हटले आहे.
“श्री वाजपेयी माझे राजकीय जीवनातील प्रेरणास्थान होते. सन १९७५ साली मी करीमनगर (तेलंगणा) जिल्हा जनसंघाचा अध्यक्ष असताना श्री वाजपेयी यांनी करीमनगर येथे एका महासभेला संबोधित केले होते. त्यानंतर काही महिन्यांनी आणिबाणी लागली व आम्हाला तुरुंगवास भोगावा लागला. या घटनेनंतर २३ वर्षांनी मला वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात गृह, उद्योग व वाणिज्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या निधनाने देशाने एक अभूतपूर्व आदर व लोकप्रियता लाभलेले राजकारणातील ‘भीष्म पितामह’ गमावले आहे; तर मी माझे लाडके नेते गमावले आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने तसेच माझ्या स्वतःच्या वतीने मी वाजपेयी यांच्या स्मृतींना आपली आदरांजली वाहतो, असे विद्यासागर राव यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.