नागपूर: शहरातील कुख्यात गुंडाचा प्रतापनगरात भरचौकात खून झाला. चार आरोपींनी धारदार शस्त्रांनी जवळपास 12 घाव घालून खून केला. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी दोन पथकाची तैनाती केली आहे. पप्पू उर्फ प्रवीण देवराव वंजारी (वय 30, रा. लोखंडे नगर) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे.
आज सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास लोखंडे नगरात एका किराणा दुकानाजवळ भांजा नावाचा गुंड हा चार साथिदारासह तेथे आला. त्यांनी प्रवीणला घेराव घातला आणि काही कळायचा आत तलवार-चाकूने सपासप वार करण्यास सुरूवात केली.
पप्पू जीव वाचविण्यासाठी पळायला लागला. आरोपींनी पप्पूचा पाठलाग करून हल्ला केला. पप्पू रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपींनी पळ काढला.
पप्पू हा पाच बहिणींमध्ये एकमेव भाऊ होता. वडीलाचे निधन झाल्यानंतर आई, पत्नी आणि दोन मुलांसह तो राहत होता. प्राथमिकदृष्ट्या हत्याकांड वर्चस्वाच्या वादातू घडल्याचा कयास लावल्या जात आहे.
भांजा नावाच्या गुंडाने हा खून केल्याचे स्पष्ट झाले असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.