Published On : Fri, Sep 7th, 2018

लारवी आढळल्यास फौजदारी कारवाई करा!

Advertisement

नागपूर: सध्या संपूर्ण शहरात डेंग्यूचा प्रकोप आहे. डेंग्यूचा प्रकोप होऊ नये, यासाठी मनपातर्फे वेळोवेळी जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येतात. मात्र, तरीही नागरिकांकडून दुर्लक्ष केले जाते. मनपाच्या तपासणी मोहिमेत यापुढे ज्या घरांमध्ये लारवी आढळली, त्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करा, असे निर्देश वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी दिले.

शुक्रवारी (ता. ७) मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती, स्थायी समिती सभागृहात वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीला समितीचे उपसभापती विजय चुटेले, सदस्य लखन येरवार, विशाखा बांते, गार्गी चोपरा, दिनेश यादव, वंदना चांदेकर, अपर आयुक्त अझीझ शेख, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. अनिल चिव्हाणे, डॉ. विजय जोशी, हत्तीरोग नियंत्रण अधिकारी जयश्री थोटे, कनक रिसोर्सेसचे कमलेश शर्मा यांच्यासह दहाही झोनचे आरोग्य विभागाचे झोनल अधिकारी उपस्थित होते.

Gold Rate
Thursday 13 March 2025
Gold 24 KT 87,100 /-
Gold 22 KT 81,000 /-
Silver / Kg 99,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सभापती मनोज चापले म्हणाले, शहरात डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी राहत्या घरी व परिसरात स्वच्छता राखणे आवश्यक आहे. याशिवाय शाळांमधूनही जनजागृती होणे आवश्यक आहे. डेंग्यूची अळी (लारवी) पाण्यात वाढते. त्यामुळे घराजवळ अथवा परिसरात कुठेही पाणी साचून राहू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. महानगरपालिकेच्या तपासणी चमूतर्फे करण्यात आलेल्या तपासणीमध्ये ज्यांच्या घरी अथवा कार्यालय परिसरांमध्ये लारवी आढळेल त्यांच्यावर फौजदारी व दंडात्मक कारवाई करून त्यांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात यावेत, असेही सभापती मनोज चापले यांनी निर्देशित केले.

प्रत्येक झोनमध्ये दर महिन्याला फवारणी करण्यात यावी. सद्या शहरात स्क्रब टायफसचेही थैमान वाढत आहे. यावर काय प्रतिबंध करता येईल व नागरिकांना काय काळजी घ्यावयाची आहे, याबाबत जनजागृती करा. शिवाय मोकळ्या जागेमध्ये वाढणारे गवत तातडीने काढून टाकण्याचेही सभापती मनोज चापले यांनी निर्देशित केले.

स्वच्छतेच्याबाबतीत आपणाला कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. आज स्वच्छतेमध्ये इंदूर अव्वल क्रमांकावर आहे. इंदूरच्या धर्तीवर नागपूर स्वच्छ करायचे असेल तर इंदूरप्रमाणे स्वच्छतेचे नियोजन करणे व योग्य कारवाई करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. गणेश विसर्जनादरम्यान झोननिहाय कृत्रिम तलाव, टँकचा सभापती मनोज चापले यांनी आढावा घेतला. गणेशोत्सवादरम्यान विसर्जनस्थळी स्वच्छतेची विशेष काळजी घ्या व गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीपासूनच झोनस्तरावर टँक उभारा, असेही निर्देश सभापती मनोज चापले यांनी दिले.

Advertisement
Advertisement