नागपूर :शेताच्या कुंपणात अवैधरित्या वीज पुरवठा जोडल्यास संबंधित ग्राहकाचा वीजपुरवठा कायम स्वरुपी खंडित करण्यात येत असून भारतिय विद्युत कायदा 2003 आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत कठोर शिक्षेची तरतूद असल्याने, शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहीत करू नये, असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.
वन्य प्राण्यांपासून शेतातील पिकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहीत करण्यात येत असल्याने मागिल काही महिन्यांत अनेक वन्य प्राणी आणि मणुष्यहानी झाली आहे. शिवाय अश्या प्रकारच्या घटनांचा गैरफ़ायदा घेत शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहीत करून वन्य प्राण्यांच्या शिकारीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात होत आहेत, रविवार दि. 9 सप्टेबर रोजी पोळ्याच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी परिसरात शेतीच्या कुंपणात प्रवाहीत विजेच्या धक्क्याने गणपत उकुंडे या शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून यापुर्वी 17 एप्रिल रोजी भंडारा जिल्ह्यातील गिरोला रिटी येथे दोन रानगवे आणि त्यांच्या दोन पिल्लांचाही शेतीच्या कुंपणात प्रवाहीत विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
विदर्भातील वन परिक्षेत्रालगतच्या परिसरातील शेतातील पिकाच्या रक्षणासाठी शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहीत करण्यात येत असली तरी यामुळे होणारे प्राणांकीत अपघात सर्वस्वी चिंतेचा विषय आहे. 23 एप्रिल रोजी भंडारा जिल्ह्यातील साकोली तालूक्यांतर्गत वलमाझरी जंगल शिवारात रानगव्याची शिकार याचप्रकारे करण्यात आली होती तर 23 मे रोजी गोंदीया जिल्ह्यातील सडक अर्जूनी तालुक्यातील रेंगेपार येथे शेती कुंपणातील वीजेच्या धक्क्याने रानगव्याचा मृत्यू झाला आहे.
वन्यप्राण्यांसोबतच याचा फ़टका सामान्य जनतेलाही बसत असून 8 जुलै रोजी वर्धा जिल्ह्यातील बाळापूर येथे रामराव टिपले या शेतक-याचा मृत्यूही शेतीकुंपणातील वीजेच्या धक्क्याने झाला आहे तर मागिल वर्षी 17 ऑक्टोबर रोजी वर्धा जिल्ह्यातील सिंधी विहीरी येथे एका वाघिणीचाही मृत्यू अश्याच प्रकारे विजेच्या घक्क्याने झाला होता याप्रकरणात संबंधित शेत मालकाला अटक झालेली असून 3 नोव्हेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात तर 7 नोव्हेंबर रोजी चिमूर येथेही शेतीच्या कुंपणातील वीजेचा धक्क्याने वाघाचा मृत्यू झाल्याचे आढळले होते.
शेतीच्या कुंपणात वीज प्रवाहीत करणे म्हणजे वीजेचा अवैध वापर असून याकरिता भारतीय विद्युत कायदयात शिक्षेची तरतूद आहे, मणूष्यहानी झाल्यास सदोष मणुष्यवध किंवा मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा भारतिय दंड संहितेच्या कलम 304 आणि इतर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात येत असून एखाद्या वन्य प्राण्याचा मृत्यू झाल्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत असून यात 7 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे सोबतच अश्या प्रकारे शेती कुंपणात वीज प्रावाहित करणा-यांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्याचीही तरतुद असल्याने शेतक-यांनी अश्या प्रकारे वीजेचा अवैध वापर टाळण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.