नागपूर : मानस चौकात बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास प्रवाशांनी भरलेल्या धावत्या बसच्या इंजिनमध्ये शॉट सर्किटमुळे अचानक आग लागली. काही क्षणातच आग वाढायला लागली. चालकाने खबरदारी म्हणून बस थांबवून प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. पोलिसांच्या मदतीने अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. वेळीच खबरदारी घेतल्याने मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार दुपारी ४ च्या सुमारास एमएच ३१ डीए ६१६९ क्रमांकाच्या बसच्या इंजिनमध्ये आग लागली. यामुळे बस चालविण्यात अडथळा निर्माण झाला. बसमध्ये १५ हून अधिक प्रवासी होते. खबरदारी म्हणून चालक मनीष कोंडमाने याने बस थांबविली. प्रवाशांना बसमधून उतरवले.
त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. नियंत्रण कक्षाने ४.१५ च्या सुमारास अग्निशमन विभागाला माहिती दिली. थोड्याच वेळात एक गाडी घटनास्थळी पोहचली. आगीत बसचे दहा हजाराचे नुकसान झाल्याची माहिती आहे.