नागपूर: येत्या 18 ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी येथे साजरा होणार्या 62 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि कामठी येथे ड्रॅगन पॅलेस येथे करण्यात येणार्या व्यवस्थेत भाविकांची कुठेही गैरसोय होणार नाही, व्यवस्थेत कोणतीही कमी राहू देऊ नका, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रशासनाला दिले. दीक्षाभूमी येथे होणार्या सर्व व्यवस्था कामठीच्या ड्रॅगन पॅलेस येथेही करण्यात याव्या. लाखो भाविक ड्रॅगन पॅलेसला भेट देत असतात. येथील व्यवस्थेतही कोणतीही कमतरता राहणार नाही, याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
दीक्षाभूमी स्मारक समितीच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ही आढावा बैठक आज झाली. या बैठकीला दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, भंते सुरेई ससाई, महापौर नंदा जिचकार, आ. प्रा. जोगेंद्रजी कवाडे, आ. प्रक़ाशजी गजभिये, आ. डॉ. मिलिंद माने, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम, दीक्षाभूमी स्मारक समितीचे विलास गजघाटे व अन्य उपस्थित होते.
24 तास पाणी जिल्हाधिकारी मुद्गल यांनी याप्रसंगी व्यवस्थेचा आढावा घेताना सांगितले की, दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस येथे 24 पाणीपुरवठा सुरु राहणार आहे. परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नळाचे कनेक्शन राहतील. याशिवाय टँकर उपलब्ध राहतील. महापालिकेने पाणी कमी पडणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी एका नोडल अधिकार्याची नियुक्ती करावी.
शौचालयाची व्यवस्था
धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या आधीपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन दीक्षाभूमीवर होत असते. येत्या 14 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण परिसर स्वच्छ करण्यात यावा. आयटीआयच्या परिसरात शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी. 1200 शौचालय या कार्यक्रमासाठ़ी उभारण्याची सूचना जिल्हाधिकार्यांनी केली. अंबाझरी तलावाच्या परिसरातही शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी. शौचालयाजवळ हॅलोजन लाईटची व अंबाझरी तलावाजवळ लाईफ गार्डची बोटींसह व्यवस्था करण्याचे निर्देशही मनपाला देण्यात आले. कामठी येथेही दरवर्षीप्रमाणे नियोजित जागेवर शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी.
प्रकाशव्यवस्था
प्रकाशव्यवस्था महापालिका आणि महावितरण यांच्या समन्वयाने होत आहे. दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस येथे गर्दीच्या व बसथांब्याच्या ठिकाणी, बसस्टँडवर, कल्पना बिल्डिंग, बजाज पुतळ्याजवळ, आरोग्य केंद्रे, सहायता केंद्रे आदींच्या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात यावी. वीजपुरवठा खंडित होणार नाही यासाठ़ी जनरेटरची व्यवस्थाही करण्यात यावी. हॅलोजन, टेबल लाईटची व्यवस्था दोन्ही ठिकाणी महावितरणतर्फे करण्यात येणार आहे.
बसेसची व्यवस्था
महापालिकेच्या वतीने दीक्षाभूमी जाण्यायेण्यासाठ़ी 125 बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बाहेरगावाहून येणार्या प्रवाशांची वाहतूक व्यवस्थासाठ़ी 125 बसेस उपलब्ध करण्यात येणार आहे. वाहतूक व्यवस्थेवर वाहतूक पोलिसांची कडक निगराणी राहणार आहे. पाईपलाईन, रस्ते खोदकाम दुरुस्तीची कामे त्वरित पूर्ण करावी. धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी येणार्या व ड्रॅगन पॅलेस येथे जाणार्या भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बसेसच्या पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था मनपाने वाहतूक विभागाच्या समन्वयाने करावी.
औषधोपचार व दवाखाने
दिनांक 14 ते 19 ऑक्टोबर या कालावधीत माताकचेरी परिसरात हेल्थ झोनची व्यवस्था मनपा, उपसंचालक आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या समन्वयाने करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिले. या दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, खाजगी दवाखान्यांमध्ये वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. मोबाईल रुग्णवाहिका औषधोपचारासाठज़ी काचीपुरा पोलिस चौक, बजाजनगर चौकीजवळ, लक्ष्मीनगर चौकाजवळ सुसज्ज रुग्णवाहिका ठेवावी. सोबत विशेष पथकाची व्यवस्थाही करावी. आरोग्य विभागाने कामठी येथेही वरील सर्व व्यवस्था करावी.
पोलिस व्यवस्था
दीक्षाभूमी परिसरात कायदा व सुव्यवस्था ठवण्यासाठी चोख पोलिस व्यवस्था ठेवण्यात यावी. वाहने पार्किंगची जागा निश्चित करण्यात यावी. पोलिस नियंत्रण व सहायता कक्ष, मोबाईल झोन ठेवण्यात यावे. दीक्षाभूमी परिसरात लाऊडस्पिकर, सिलेंडर, स्टोव्ह व इतर विस्फोटक वस्तू आणण्यास मनाई आहे. पोलिस विभागाने सतत मोक्का पाहणी करीत राहावे. या परिसरात असणार्या कार्यालयांमधील कर्मचार्यांना त्यांच्या ओळखपत्रावर सोडण्याची विनंती पोलिस विभागाला करण्यात आली.
अन्नदान
दीभाभूमी परिसराच्या 100 मीटरपर्यंत अन्नदान करता येणार नाही. विविध वस्तूंच्या पारंपरिक स्टॉलधारकांना मात्र परवानगी राहील. अन्नदान करणार्या संस्थांनी मनपाकडे नोंदणी करावी. अन्न व औषधी द्रव्ये विभागाने अन्नाची तपासणी करावी. खराब झालेले अन्न व कचरा उचलण्याची कारवाई तात्काळ करण्यात यावी. आग प्रतिबंधक यंत्रणा म्हणून पोर्टेबल अग्निशमन यंत्रे ठेवण्यात यावी.
होर्डिंग व सूचना फलक
धम्म चक्र प्रवर्तन दिनासाठी येणार्या लाखो भाविकांना व्यवस्थेची माहिती व्हावी म्हणून होर्डिंग व सूचना फलक प्रत्येक ठिकणी लावण्यात यावी. ही जबाबदारी मनपा व दीभाभूमी स्मारक समितीकडे देण्यात आली. आकस्मिक पाऊस आल्यास पर्यायी निवासी व्यवस्था दीक्षाभूमीच्या जवळपास असलेल्या शाळा महाविद्यालयांमध्ये करण्यात यावी.
नियंत्रण कक्ष
या परिसरात एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येईल. प्रत्येक विभागाने नियुक्त केलेला संपर्क अधिकारी येथे बसण्याची व्यवस्था करण्यात याी. अधिकार्याचे नाव, मोबाईल क्रमांक पोलिस विभाग, स्मारक समिती, जिल्हाधिकारी कार्यालय यांना देण्यात यावे.
सीसीटीव्ही कॅमेरे
दीक्षाभूमी परिसरात होणार्या लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता सीसीटीव्ही लावण्याबाबची कारवाई मनपा व पोलिस विभागाने सम्नवयाने करावी. डॉ. आंबेडकर कॉलेज येथील एनसीसी व एनएसएसचे विद्यार्थी या कार्यक्रमासाठी स्वयंसेवक म्हणून पोलिस विभागाच्या सम्नवयाने कार्य करतील. स्मारक समितीने व डॅ्रगन पॅलेसतर्फे स्वयंसेवकांची यादी पोलिस विभागाला पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या.
याशिवाय सर्व संबंधित शासकीय विभागांनी व अधिकार्यांनी आपापल्या विभागातर्फे करण्यात येणार्या सुविधांचा आढावा घ्यावा. व्यवस्थेत कुठेही गैरसोय राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री व जिल्हाधिकार्यांनी दिले.