प्रशासनाद्वारे डेंग्यूबाबत केलेल्या उपाययोजनांचा घेतला आढावा
नागपूर: डेंग्यू, मलेरिया यासाराख्या रोगांवर योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे. डेंग्यूचे प्रमाण दिवेंसदिवस वाढत आहे. त्यारोगांवर करावयाच्या उपाययोजनांची जनजागृती करणे अत्यावश्यक असल्याचे उत्तर नागपूरचे आमदार डॉ.मिलिंद माने यांनी सांगितले. सोमवारी (ता.२२) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात डेंग्यूसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य अधिकारी (दवाखाना)डॉ.सुनील कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, मलेरिया व फायलेरिया विभागाच्या प्रमुख जयश्री थोटे, झोन सहायक आयुक्त सुवर्णा दखने, महेश मोरोणे, राजू भिवगडे, राजेश कराडे, प्रकाश वराडे, सुभाष जयदेव, गणेश राठोड, हरिश राऊत, सर्व झोनचे झोनल अधिकारी, वैद्यकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रारंभी आमदार डॉ.मिलिंद माने यांनी प्रशासनाकडून आढावा घेतला. जानेवारी २०१८ ते ऑक्टोबर २०१८ पर्यंत २४३ डेंग्यूसदृश्य रूग्ण आढळले आहेत. सप्टेंबर महिन्यात १५२ रूग्ण आढळले असल्याची माहिती मलेरिया व फायलेरिया विभागाच्या प्रमुख जयश्री थोटे यांनी दिली. याशिवाय ज्या-ज्या भागात डेंग्यूसदृश्य रूग्ण आढळले आहेत त्या-त्या भागात प्रभातफेरी काढणे, रोगाबाबत जनजागृती करणारी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जयश्री थोटे यांनी दिली. डास उत्पत्ती स्थानांवर गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. याशिवाय फवारणीचे नियोजनदेखिल करण्यात आले असल्याची माहिती श्रीमती थोटे यांनी दिली. मोकळ्या भूखंडावर फवारणी, सार्वजनिक विहिरींमध्ये गप्पी मासे सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त संपूर्ण शहरामध्ये जनजागृतीसाठी सुमारे सहा लाख पत्रके वाटप केले असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.मिलिंद माने यांनी, ज्या भागात डेंग्यू सदृश्य रूग्ण आढळले आहेत, त्याभागातील नोंदणीकृत दवाखान्यांना नोटीस बजावण्यात यावी, परिसरात स्वच्छता मोहिम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात यावी, असे निर्देश दिले. ज्यांचे मोकळे भूखंड आहेत त्यांना नोटीस बजावण्यात याव्यात. त्यांनी आपला भूखंड स्वच्छ ठेवण्याचे काम तातडीने करावे, असे सांगत आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन नागरिकांना करावे, असेही निर्देश डॉ.मिलिंद माने यांनी केले. डॉक्टरांनी डेंग्यूच्या रूग्णांना याबाबत आश्वस्त करावे, रूग्णांचा आत्मविश्वास वाढविला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
डेंग्यू या रोगाबाबात नागरिकांमध्ये जागरुकता आणण्याकरिता प्रयत्न केले पाहिजे. या रोगांवर काय उपाययोजना करावयाच्या याची जनजागृती मोठ्या प्रमाणावर करण्यात यावी, असे निर्देश डॉ.मिलिंद माने यांनी दिले. महापालिकेच्या होर्डिंग्सवर यासंदर्भातील बॅनर लावावे, असेही निर्देश त्यांनी दिले. रेडिओ जिंगल्सच्या माध्यमातूनही जनजागृती मोठ्या प्रमाणावर करावी, असेही डॉ.माने यांनी सांगितले. यावेळी आमदार डॉ.मिलिंद माने यांनी झोननिहाय कार्यवाहीचा आढावा घेतला.