नागपूर: अल्पसंख्यांक समाजातील तरुणांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात येत असून शिक्षणासह विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचवत शासन अल्पसंख्यांक समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुनजमा फलाईया या संस्थेतर्फे हॉटेल ओरियंटल तय्यबाह येथे ‘सुफीझम, मानवता आणि मुस्लिम समुदायाचे राष्ट्रनिर्मितीमध्ये योगदान’ या विषयावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, सय्यद फजलुल्लाह चिश्ती, सय्यद अजीमुद्दीन रिजवी, मौलाना इमरान मजहर बरकाती, शारिक शेख, अफजल मिट्ठा, सय्यद इमरान हुसैन, निसार सिद्दीकी, मुहम्मद तनवीर, अहमद शरीफ खान तसेच संस्थेचे अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सुफी संतपरंपरेने मानवता व प्रेमाचा संदेश सर्व जगभर पोहचविला. जगाला मार्ग दाखविला. अनेकांच्या जीवनात बदल घडविला, ही प्रेरणा आपण घेणे गरजेचे आहे. सुफी संतपरंपरेच्या संदेशामुळे देशातील विविध विचारधारांचे लोक एकत्र आले. शांततेचा पाया याच परंपरेने रचला. हे विचार आपण पुढे नेण्याची गरज आहे. आला हजरत इमाम अहमद रजा यांचे व्यक्तीमत्व अष्टपैलू होते. ते ज्ञानाचे भांडार होते.
विविध विषयातील ज्ञान लोकांपर्यंत पोहचवत त्यांनी लोकांची मनेही जिंकली. समाजातील गरजू आणि वंचितांचा विकास होणे गरजेचे आहे. अल्पसंख्यांक समाजातील लाभार्थ्यांपर्यंत विविध योजना पोहचविण्यात येत असून अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी चार वर्षाच्या कालावधीत राज्यात 17 वसतीगृहांची निर्मिती करण्यात आली. चार वर्षांमध्ये शिष्यवृत्तीसाठी शंभर करोड रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे शुल्कही शासनामार्फत भरण्यात येत आहे. अल्पसंख्यांक समाजातील तरुणांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन देण्यात येत असून कौशल्य विकास योजनेअंतर्गतही विविध लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, सर्व समाजाच्या कल्याणाचे मागणे मागणाऱ्या सुफी संतपरंपरेने शांतता आणि प्रेमाचा संदेश दिला. सामाजिक परिवर्तनाचे काम मोलाचे असून संस्कारीत समाजासाठी नैतिकता आवश्यक असते. समाजमन घडविण्यासाठी समाजसुधारक दूरगामी विचार करतात. दारिद्रय निर्मूलनासाठी आर्थिक-सामाजिक प्रगती साधणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. शाश्वत विकासासाठी ज्ञान महत्वपूर्ण असून आता ज्ञानाचे संपन्नेत परिवर्तन करणे गरजेचे असल्याचे श्री.गडकरी यांनी सांगितले.
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, सुफी संतपरंपरेच्या संदेशावर विचारमंथन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला परिसंवाद अतिशय उपयुक्त ठरणार आहे. एकात्मतेची भावन दृढ करण्यासाठी अशाप्रकारच्या परिसंवादाचे आयोजन आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेत सर्वांना समान अधिकार देण्यात आले असून याद्वारे सर्व समाजाला एकत्रित घेऊन विकास साधला पाहिजे. आपल्याकडील ज्ञानाचा आणि लोकसंख्येचा आपण सकारात्मक दृष्टीकोनातून उपयोग करुन घ्यायला हवा, असेही श्री. अहीर यांनी सांगितले.
सय्यद फजलुल्लाह चिश्ती म्हणाले, विविध समाजांमध्ये ज्ञानाचे आदान-प्रदान होणे आवश्यक असून यामधील संस्कारांच्या पायाभरणीवरच सशक्त राष्ट्राची उभारणी होऊ शकते. सुफी संतपरंपरा शांतता आणि प्रेमाचा संदेश देणारी असून यावर आधारित आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादामुळे समाजातील एकोपा वाढीस लागण्यास नक्कीच मदत होईल, असेही चिश्ती यांनी सांगितले.
प्रास्ताविकात अहमद शरीफ खान म्हणाले, मुनजमा फलाईया ही सामाजिक संस्था समाजातील गरजू घटकांसाठी मुलभूत प्रश्नांवर कार्यरत आहे. गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे. पुढील पिढीला चांगले शिक्षण, संस्कार व सुरक्षितता मिळणे गरजेचे असल्याचेही खान यांनी सांगितले. सूत्रसंचालन नदीम शेख यांनी केले. आभार शारीक शेख यांनी मानले.