नागपूर: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम कर्मचाऱ्यास अथवा त्याच्या अवलंबितास मिळण्यासाठी महावितरणच्यावतीने विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे त्यामुळे ज्या सेवानिवृत्त अथवा कंपनी सोडलेल्या कर्मचाऱ्यांची रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये शिल्लक आहे. अशा कर्मचाऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या. तथा पुर्वीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामधुन सेवानिवृत्त तथा इतर कारणास्तव मुदतपुर्व सेवा समाप्त झालेल्या काही कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये आजही रक्कम शिल्लक असून त्याची मागणी करण्यात आलेली नाही. भविष्य निधी कायदयाच्या तरतुदीनुसार कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात मागणी न केलेली रक्कम ठराविक कालावधीनंतर खात्यात ठेवता येत नाही.
ज्येष्ठ नागरीक कल्याण निधी नियम 2016 मधील नियमावलीनुसार ही रक्कम विहित कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांनी खात्यातून न काढल्यास ही रक्कम प्रथमत: RPFC व त्यानंतर केंद्रशासनाच्या योजनेंतर्गत वर्ग करण्यात येते.
त्यामुळे अशा प्रकारच्या शिल्लक रक्कमेबाबत कंपनीतील सेवानिवृत्त / मृत पावलेल्या / राजीनामा दिलेल्या / बडतर्फ केलेल्या / सेवेतून काढून टाकलेल्या /गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना अथवा त्यांच्या अवलंबितांनी त्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये असलेल्या शिल्लक रक्कमेच्या अधिक माहितीसाठी कागदपत्रांसहित सेवेत असतांना अंतिम ठिकाणी कार्यरत असलेल्या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा. अशा कर्मचाऱ्यांची सूची कंपनीचे संकेतस्थळ www.mahadiscom.in (विभाग – मानव संसाधन विभाग – नोटिफिकेशन्स) येथे उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.