नागपूर : उद्यापासून दिवाळी सुरू होत आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र स्वच्छता राखली जावी, यासाठी काळजी घेण्यात यावी. शहरात सर्वत्र स्वच्छतेसाठी प्रत्येक झोनमध्ये स्वच्छता कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये काही सफाई कामगार स्थायी असून काही ऐवजदारांचा समावेश आहे. मात्र काही सफाई कामगारांकडून कामचुकारपणा केला जात असून काही सफाई कामगार निर्धारित प्रभागातील स्वच्छतेच्या कामाला दांडी मारून खासगी कामे करीत असल्याचे पुढे येत आहे. अशा सफाई कामगारांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. शहरात झोनस्तरावरील समस्यांचा आढावा घेण्यासाठी शनिवारी (ता. ३) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी महापौर बोलत होत्या.
बैठकीत उपनेत्या वर्षा ठाकरे, प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, लक्ष्मीनगर झोनचे सभापती प्रकाश भोयर, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, हनुमाननगर झोन सभापती रूपाली ठाकूर, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, सतरंजीपुरा झोन सभापती यशश्री नंदनवार, आसीनगर झोन सभापती वंदना चांदेकर, मंगळवारी झोन सभापती संगीता गि-हे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) सुनील कांबळे, डॉ. प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त सुवर्णा दखने, महेश मोरोणे, राजू भिवगडे, स्मीता काळे, अशोक पाटील, प्रकाश वराडे, सुभाष जयदेव, गणेश राठोड, हरिश राउत आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, शहरात सर्वत्र स्वच्छता राखली जावी व सफाई कामगारांच्या कामावर देखरेख ठेवता यावी यासाठी सफाई कामगारांना ‘जीपीएस वॉच’ देण्यात आल्या आहेत. मात्र यानंतरही अनेक सफाई कामगार काम करीत नसल्याच्या तक्रारी आहेत. या ‘जीपीएस वॉच’चा दैनंदिन आढावा घेण्यात यावा, असेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले. याशिवाय मनपामध्ये कार्यरत स्थायी सफाई कामगार व ऐवजदार महानगरपालिकेचे वेतन घेऊन खासगी काम करीत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा सफाई कामगार व ऐवजदारांवरही कारवाई करा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. कामचुकार सफाई कामगारांना अभय देणा-या झोनल अधिका-यांवरही कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापौर नंदा जिचकार यांनी दिला.
शहरातील विविध ठिकाणचे पथदिवे बंद आहेत. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात सर्व झोनमध्ये पथदिव्यांची योग्य व्यवस्था करण्यात यावी. नवीन पथदिवे लावणे, पथदिव्यांची दुरूस्ती आदी कामे वेळेवर सुरळीत व्हावे याकडेही लक्ष देण्याचे यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले. शहरात सिवरेज लाईनची समस्या भेडसावत आहे. सर्व झोनमध्ये सिवरेज लाईनच्या कामाची योग्य प्रकारे काळजी घेण्यात यावी. सिवरेज लाईन बाधित झाल्यास त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर पडतो. त्यामुळे सिवरेजचे काम चांगल्या दर्जाचे होतील याची काळजी घ्या, असे निर्देशही महापौर नंदा जिचकार यांनी दिले. शहरातील सर्व झोनमधील समस्यांबाबत प्रत्येक महिन्यात आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी सांगितले.