Published On : Fri, Jan 4th, 2019

मराठी भाषेच्या विकासासाठी शासन कटिबद्ध -मुख्यमंत्री

Advertisement

जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे उद् घाटन
मराठी ज्ञान भाषा व्हावी
मराठीसाठी नागपूरचे बलिदान मोठे

नागपूर: जगाच्या पाठीवर अतिशय प्राचीन भाषा म्हणून मराठीचा उल्लेख अभिमानाने करावा लागेल. मराठी भाषा ही अमृताचा ठेवा असून मराठी भाषेसाठी नागपूरचे बलिदान मोठे आहे. भाषेसाठी एवढे बलिदान दुसऱ्या कुठल्याही शहराने दिले नाही. त्यामुळे जागतिक मराठी साहित्य संमेलन नागपुरात होत असल्याचा आनंद आहे. एकविसाव्या शतकाच्या तत्त्वानुसार मराठीला विकसित करणे गरजेचे असून मराठी भाषेच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Gold Rate
Wednesday 19 March 2025
Gold 24 KT 88,900 /-
Gold 22 KT 82,700 /-
Silver / Kg 101,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

16 व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. जागतिक मराठी अकादमीच्या वतीने ‘शोध मराठी मनाचा’ या थीमवर जागतिक मराठी साहित्य संमेलन येथील वनामती सभागृहात दिनांक 6 जानेवारी पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार, महापौर नंदा जिचकार, माजी खासदार अजय संचेती, दत्ता मेघे, वनामतीचे संचालक रविंद्र ठाकरे, यशवंतराव गडाख, गिरीश गांधी व शशिकांत चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दीप प्रज्वलन करुन संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, परदेशात मराठी माणसाने आपल्या कर्तृत्वावर विश्व उभे केले आहे. यातून सामान्य मराठी तरुणाला प्रेरणा मिळत आहे. आपल्या आजूबाजूला प्रेरणा देणारे खूप व्यक्ती असतात. त्या व्यक्तींकडून तरुणाईने खूप काही शिकण्यासारखे आहे.

जगाच्या पाठीवर असलेल्या प्राचीन भाषेत मराठीचा समावेश होतो, याचा अभिमान असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, चित्रपटसृष्टी मराठी माणसाने समृद्ध केली आहे. मराठी नाटकाचे स्थान आजही अव्वल आहे. मराठी साहित्य जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे. हे युग इंटरनेटचे युग असून 21व्या शतकाच्या तत्त्वानुसार मराठी भाषा विकसित करणे गरजेचे आहे. मराठी भाषेला ज्ञान भाषेचा प्रवास वाढवावा लागेल. यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल,असे मुख्यमंत्री म्हणाले.

मराठी भाषेची गोडी नवीन पिढीमध्ये निर्माण करण्याची गरज असून मराठी अस्मिता जपण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. माणूस हा गुणवत्तेने मोठा असतो. असे सांगून गडकरी म्हणाले की, भाषेच्या विकासासाठी समाजाला किंवा सरकारला जबाबदार धरण्यापेक्षा प्रत्येकाने आपली गुणवत्ता व क्षमता वाढविल्यास भाषेचा व पर्यायाने मराठी माणसाचा सन्मान वाढेल.मराठीचे योग्य सादरीकरण नव्या पिढीसमोर झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार म्हणाले की, व्यवसायानिमित्त परदेशात असलो तरी मनाने आजही मराठीच आहे. अलिकडच्या काळात भारताची जगात पत वाढली आहे. भारत आर्थिक महासत्ता होण्याच्या वाटेवर असून मूलभूत सोयीसुविधांचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. भारतातील लोकशाही ही जगात श्रेष्ठ असून लोकशाहीमुळे भारत महासत्ता होईल, असे ते म्हणाले. जागतिक मराठी साहित्य संमेलनातून तरुणांना प्रेरणा मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

विदेशात गेलेला मराठी माणूस हा स्वत:च्या हिमतीवर व कष्टाने आपले नाव उज्ज्वल करतो. ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे. डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांनी अमेरिकेसारख्या देशात संघर्ष करुन आपला व्यवसाय उभा केला. त्यांच्या सारखाच माणूस जागतिक साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो. ही बाब अभिनंदनीय असल्याचे माजी गृह मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सांगितले. शोध मराठी मनाचा हे संधी देण्याचे व्यासपीठ असून मराठी माणसाला व मराठीला सातासमुद्रापार ओळख मिळवून देणार आहे, असे ते म्हणाले.

जागतिक अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे म्हणाले की, घरात मराठी बोलले पाहिजे. इंग्रजी ही नोकरीची भाषा असून जगण्याची नाही. मराठी जगविण्याची जबाबदारी केवळ सरकारची नसून समाजाची सुद्धा आहे. राज्यात नववीपर्यंत मराठीला प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. इतरांच्या प्रगतीचा आदर्श आपल्यासमोर ठेवावा व नव्या वाटा चोखाळाव्या. यासाठी शोध मराठी मनाचा हे व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले. गिरिश गांधी यांनी संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका प्रास्तविकात विशद केली.

संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीनिवास ठाणेदार यांच्या ‘ही ‘श्री’ ची ईच्छा’ या पुस्तकाच्या 50व्या आवृत्तीचे व पुन्हा श्री गणेशा या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितांचे आभार विष्णू मनोहर यांनी मानले. या कार्यक्रमात साहित्यिक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement