Published On : Sat, Jan 5th, 2019

सन २०३५ मध्ये विकासाच्या जागतिक क्रमवारीत नागपूर अव्वल राहणार!

Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : वंजारी नगर ओव्हरपास व अन्य विकासकामांचे भूमिपूजन

नागपूर : मागील चार वर्षात नागपूर शहरात जो विकास झाला आहे त्याचे पडसाद केवळ देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर उमटत आहेत. नुकतीच इकॉनॉमिक फोरममध्ये सर्वात विकसित शहरांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. त्या यादीमध्ये सन २०३५ मध्ये नागपूर हे जगात सर्वाधिक विकसित शहर राहणार असल्याचे म्हटले आहे. ही बाब नागपूरच्या दृष्टीने गौरवशाली असल्याचे आणि या राज्याचे शासन म्हणून आम्हाला त्याचा अभिमान असल्याचे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

Gold Rate
Tuesday18 March 2025
Gold 24 KT 88,700 /-
Gold 22 KT 82,500 /-
Silver / Kg 100,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दक्षिण नागपूर मधील वंजारी नगर पाण्याची टाकी ते अजनी पुलापर्यंतच्या चार पदरी ओव्हरपास पूल आणि अन्य काही विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार गिरीश व्यास, उपमहापौर दीपराज पार्डीकर, मनपाचे स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांच्यासह दक्षिण नागपुरातील सर्व नगरसेवक उपस्थित होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वंजारी नगर पाण्याच्या टाकीपासून अजनीपर्यंतच्या पुलाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. यात अनेक अडथळे आलेत. परंतु हे कार्य केवळ ना.नितीन गडकरी यांच्यामुळेच शक्य झाले आहे. नागपूर शहराचा मागील चार वर्षांत सर्वांगीण विकास झाला. असा कुठलाही घटक नाही, ज्याचे काम झाले नाही. हे शहर बदलत आहे. हे शहर आधुनिक होत आहे. हे शहर जागतिक होत आहे, असे म्हणत त्यांनी नागपूरच्या जनतेचे आभार मानले. नागपूरकरांनी आम्हाला निवडून दिले म्हणूनच हे शक्य झाले, असे गौरवोद्‌गार त्यांनी काढले. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. नितीन गडकरी यांच्या वंजारी नगर पाण्याची टाकी ते अजनी पुलापर्यंतच्या प्रस्तावित ओव्हरपास ब्रीजचे भूमिपूजन व अन्य नियोजित विकासकामांचे ई-भूमिपूजन पार पडले. प्रास्ताविकातून आमदार सुधाकर कोहळे यांनी भूमिपूजन होत असलेल्या विकासकामांची माहिती दिली. मागील चार वर्षांत दक्षिण नागपुरात झालेल्या विकासकामांचीही त्यांनी यावेळी माहिती दिली.

नागपूर ठरणार देशातील पहिले ‘स्मार्ट ट्रान्सपोर्ट शहर’ : ना. नितीन गडकरी
नागपूर शहराचा चौफेर विकास होत आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करुन दिल्या जात आहे. मेट्रोसोबतच ब्रॉडगेज मेट्रोने नागपूरलगतची शहरे जोडली जात आहे. अजनी येथे मल्टीमोडल हब तर खापरी येथे लॉजिस्टिक हब तयार होत आहे. सिंदी येथे ५० एकरची जमीन अधिग्रहीत करण्यात येत असून तेथे ब्रॉडगेज मेट्रोची डबे बनविण्याचा कारखाना तयार होणार आहे. आऊटर रिंगरोडचे काम पूर्ण होत आहे. नागपूर आंतराष्ट्रीय विमानतळ निर्मितीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नवीन वर्षात मुख्यमंत्री त्याची घोषणा करून नागपूरकरांना सरळ आंतरराष्ट्रीय शहरांशी जोडतील. एकंदरच नागपूरची सार्वजनिक आणि अन्य वाहतूक स्मार्ट होत आहे.

नागपूर हे देशातील पहिलेवहिले स्मार्ट ट्रान्सपोर्ट शहर ठरेल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी दिली. नागपूर-काटोल मार्ग, नागपूर-उमरेड मार्ग चार पदरी, नागपूर-भंडारा मार्ग सहा पदरी होणार असून त्यासाठी निधीलाही मंजुरी देण्यात आली आहे. नागपूर-नागभीड रेल्वे ब्रॉडगेज होत आहे. रेल्वे स्थानकासमोरील पूल तोडून तेथे आठ पदरी रस्ता तयार करण्यात येणार आहे. फुले मार्केट, संत्रा मार्केट, नेताजी मार्केट यांचा मेट्रो विकास करीत असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्केट तेथे तयार होत आहे. तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पीटल अत्याधुनिक दर्जाचे होत आहे. त्यासाठी ५० कोटी मंजूर झाले आहेत. अशी अनेक विकास कामे सुरू झाली आहेत, अनेक प्रस्तावित आहेत. एकट्या नागपूर लोकसभा मतदार संघात ६६ हजार कोटींची विकास कामे होत असून पुढील काही वर्षांत नागपूरचा चेहरामोहरा बदलेल, असा विश्वास ना.नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. आपण नागपूर शहरातील ५० हजार बेरोजगारांना रोजगार देण्याचा संकल्प केला होता, त्यापैकी २३ हजार रोजगार मिहानमध्ये उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले.

दोन्ही नेत्यांमुळे नागपूर विकासात आघाडीवर : ना. चंद्रशेखर बावनकुळे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे नागपूरची ओळख आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली आहे. केंद्रीय रस्ते निधीतून १६०० कोटी रुपयांचा आऊटर रिंग रोड पूर्णत्वाकडे असून जुलै-२०१९ अखेर पूर्ण होईल. दक्षिण नागपुरात चार मोठे सबस्टेशन होणार आहे. विद्युत वाहिन्या भूमिगत होणार आहेत. मे-२०१९ पर्यंत नागपूर शहरातील संपूर्ण पथदिवे एलईडीमध्ये परावर्तीत होतील. नागपूर शहरात सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक वातावरण तयार करण्यात ना. गडकरी यांचा सिंहाचा वाटा आहे. नागपूर शहरातील ६५ मैदानांच्या विकासासाठी ५० कोटी रुपये शासनाने मंजूर केले. सर्वांसाठी अन्न, सर्वांसाठी घरे आणि सर्वांसाठी आरोग्य या उद्देशाने शासन कार्य करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत ५०० कोटींचे विशेष अनुदान नागपूरला दिले. जीएसटीमध्ये झालेल्या नुकसानीची तूटही त्यांनी भरून काढली, असे म्हणत नागपूरच्या जनतेच्या वतीने त्यांनी दोन्ही नेत्यांचे आभार मानले

भूमिपूजन झालेली विकासकामे
कार्यक्रमात वंजारी नगर पाणी टाकी ते अजनी पुलापर्यंतचा ओव्हरपास ब्रीजचे भूमिपूजन तर एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत ५७ कोटी रुपये किंमतीचे ३३ के.व्ही. उपकेंद्र व वीजवाहिनी, नागपूर सुधार प्रन्यास अंतर्गत पंडित दीनदयाल उपाध्याय ई-लायब्ररी आणि नागपूर महानगरपालिकेअंतर्गत होत असलेल्या ७५ कोटी रुपये किंमतीच्या सीमेंट रस्त्यांचे ई-भूमिपूजन करण्यात आले.

Advertisement
Advertisement