Published On : Thu, Jan 10th, 2019

पराभव समोर दिसू लागल्याने मोदी फडणवीसांकडून जुमलेबाजी पार्ट -२ सुरुः खा. अशोक चव्हाण

Advertisement

नागपूर: मोदी फडणवीसांनी निवडणुकीपूर्वी दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. निवडणुकीत मते मिळतील असे एकही काम गेल्या साडेचार वर्षात केंद्र आणि राज्य सरकारने केले नाही. कामाच्या जारोवर लोकांनाकडे मते मागायाची सोय राहिली नाही. आगामी निवडणुकीतला पराभव समोर दिसू लागल्यामुळेच मोदी फडणवीसांकडून जुमलेबाजी पार्ट -२ सुरु झाला आहे. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रे कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे. ते नागपूरच्या रामटेक येथे जनसंघर्ष यात्रेच्या जाहीर सभेत बोलत होते.

आज सकाळी दीक्षाभूमिवर अभिवादन करून काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याची सुरुवात झाली. दीक्षाभूमीपासून शहरातील प्रमुख मार्गांनी जनसंघर्ष यात्रेची विशाल मिरवणूक निघाली. यात्रेत सहभागी झालेले सर्व प्रमुख नेते एका खुल्या जीपवर आरूढ होऊन नागरिकांना अभिवादन करीत होते. या यात्रेचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी व नागरिकांना चौका-चौकात फुले उधळून स्वागत केले. ठिकठिकाणी ढोलताशांच्या गजरामुळे नागपूर शहर दणाणून गेले होते. या मिरवणुकीदरम्यान काँग्रेस नेत्यांनी संत ताजुद्दिन बाबा दर्गा आणि गणेश टेकडी मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर ही यात्रा कामठीकडे रवाना झाली.

Gold Rate
Tuesday18 March 2025
Gold 24 KT 88,700 /-
Gold 22 KT 82,500 /-
Silver / Kg 100,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रस्त्यात ठिकठिकाणी नागरिकांनी जनसंघर्ष यात्रेचे जंगी स्वागत केले. त्यानंतर रामटेक येथे विशाल जनसंघर्ष सभा पार पडली. यावेळी व्यापसपीठावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री आ. नसीम खान, वसंत पुरके, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, आ. सुनिल केदार, माजी मंत्री व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी आ. मुझफ्फर हुसेन, मुनाफ हकीम, अमोल देशमुख, अनंतराव घारड, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शाम उमाळकर, प्रकाश सोनावणे, रामकिशन ओझा, सचिव तौफिक मुल्लाणी, शाह आलम शेख चंद्रहास चौकसे आदी उपस्थित होते.

या सभेला मार्गदर्शन करताना खा. चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, नुकतेच विदर्भाला लागून असलेल्या मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये जनतेने भाजपला पराभूत केले. राजस्थानमधील जनतेने काँग्रेसचे सरकार निवडून दिले त्यामुळे देशात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत हे स्पष्ट झाले आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्याबरोबर पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा घेतला. तिन्ही राज्यातील शेतक-यांची कर्ज माफ केली. महाराष्ट्र सरकारने दोन वर्षापूर्वी कर्जमाफीची घोषणा केली अद्याप शेतक-यांची कर्ज माफ झाली नाहीत. काँग्रेस सरकारने दिलेल्या आश्वासनांची तात्काळ पूर्तता केली. भाजपने मात्र खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली आहे.

महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. प्यायला पाणी नाही. जनावरांना चारा नाही. लोकांच्या हाताला काम नाही. शेतीमालाला भाव नाही. शेतकरी दूध व भाजीपाला रस्त्यावर फेकत आहेत. राज्यात सतरा हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहत पण सरकार शेतक-यांना दिलासा देण्यासाठी काही करत नाही. विदर्भात धान, तूर, सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे पण खरेदी केंद्र सुरु नाहीत.

विदर्भात एकही नविन उद्योग आला नाही त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. नोकरी मागणा-या तरूणांना पंतप्रधान पकोडे विकायला सांगत आहेत. काल तर सोलापूरमध्ये पंतप्रधानांना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणा-या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम माराहण केली. मोदी सरकारचे फक्त १०० दिवस राहिले आहेत. आता ही दंडेलशाही चालणार नाही, असा इशारा देऊन खा. चव्हाण म्हणाले की, धर्मनिरपेक्ष मतांची फाटाफूट झाल्यामुळे भाजपला फायदा झाला राज्यात समविचारी पक्षांची महाआघाडी करून भाजपला पराभूत करू.

विधानभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार सुनिल केदार यांनी आपल्या भाषणांमधून मोदी सरकारवर सडकून टीका केली.

उद्या शुक्रवार दि. ११ जानेवारी रोजीचा जनसंघर्ष यात्रेचा कार्यक्रम

सकाळी १०.०० वा. गोंदिया, दुपारी २.०० वा. सडक अर्जुनी तर सायंकाळी ४.०० वा. साकोली जि. भंडारा येथे जाहीर सभा होणार आहेत.

Advertisement
Advertisement