मुंबई: भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून बेधडक हल्ला केला आणि दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. ही प्रत्येक भारतीयासाठी अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे. भारतीय सैनिकांचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे. या असामान्य शौर्याचे कौतुक करण्याकरिता शब्द अपुरे आहेत.
परंतु हृदयातून भले शाब्बास हे उद्गार आपसूकच बाहेर पडत आहेत. अशा भावनातूर शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी भारतीय हवाईदलाचे अभिनंदन केले आहे.
या संदर्भात आपल्या भावना व्यक्त करताना खा. चव्हाण म्हणाले की, भारतीय हवाईदलाने केवळ हल्लाच केला नाही तर पाकिस्तानाच्या डोळ्यासमोर दहशतवादी तळ उद्धवस्त करून सुखरूप परत आले. ही अतिशय नेत्रदिपक कामगिरी आहे. या कारवाईतून पाकिस्तानला पुन्हा एकदा भारतीय सामर्थ्याचे दर्शन झाले असेलच. १९७१ साली तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने पाकिस्तानचा फक्त पराभवच तर विभाजन करून बांग्लादेशाची निर्मिती केली. पाकिस्तानचे ९१ हजार सैनिक त्यावेळी भारतीय सैन्यापुढे शरण आले होते.
भारतीय सैन्यामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे पाकिस्तानला तसाच धडा शिकवण्याची वेळ आली आहे. दहशतवाद्यांचा म्होरक्या मसूद अझहरचा खात्मा करून पुन्हा दहशतवाद्यांना आश्रय देण्याची हिम्मत पाकिस्तानला होता कामा नये इतकी कठोर कारवाई करावी आणि पाकिस्तानला नेस्तनाबूत करावे अशी भावना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली.