मनपा शाळेतील शिबिराचा समारोप : कलादालनचा उपक्रम
नागपूर: नागपूर महानगरपालिकांच्या शाळांत शैक्षणिक उपक्रमांसोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ग्रीष्मकालीन शिबिराचे आयोजन करण्यात येते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना कलेचे ज्ञान अवगत होते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने असे उपक्रम उत्तम असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले.
नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या कलादालनतर्फे येथील वाल्मिक हिंदी माध्यमिक शाळेत ४ ते २५ एप्रिल दरम्यान आयोजित ग्रीष्मकालीन शिबिराचा समारोप गुरुवारी (ता. २५) झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर उपायुक्त राजेश मोहिते, तरंग संस्थेच्या सदस्या शुभदा खिरवाडकर, संगीता झा, श्रीमती फुके, मुख्याध्यापिका संध्या मेडपल्लीवार, शाळा इन्चार्ज रजनी परिहार, ज्येष्ठ शिक्षक चंदू वैरागडे उपस्थित होते.
यावेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी विद्यार्थ्यांसोबतच शिबीर आयोजित करणाऱ्या शिक्षकांचेही कौतुक केले. उपायुक्त राजेश मोहिते यांनीही असे शिबिर वेळोवेळी आयोजित करण्याची गरज प्रतिपादित केली. मुख्याध्यापिका संध्या मेडपल्लीवार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
सदर शिबिरात मनोज यादव, रिना यादव, कमल घोडमारे, अशोक वायकुडे, प्रशिता पहाडे आदी प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना ॲथेलेटिक्स, हस्तकला, सिरॅमिक्स, ज्वेलरी मेकिंग, जैविक खत तयार करणे, संगीत, नृत्य आदींचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंचे प्रदर्शनी लावण्यात आली. वस्तूंची विक्री करून विद्यार्थ्यांनी कमाईसुद्धा केली. समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक रजनी परिहार यांनी केले. संचालन हर्षा भोसले यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक व शिबिरार्थी विद्यार्थी उपस्थित होते.