रेल्वेस्थानकावर पती पत्नीची गळाभेट. बेपत्ता पती मिळाला ६ महिण्यानंतर
Representational Pic
नागपूर: सहा महिण्यापूर्वी कामाच्या शोधात घरातून बाहेर पडलेल्या पतीला समोर पाहिले आणि त्या दोघांच्याही अश्रूंचा बांध फुटला. सहा महिण्यांचा विरहानंतर दोघेही एकमेकांसमोर येताच त्यांच्या तोंडून शब्दच निघेना. केवळ त्यांच्या भावना बोलत होत्या. हृद्यभरून येणार प्रसंग आज मंगळवारी सायंकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर घडला. या प्रसंगामुळे त्यांच्या आयुष्याची गाडी पुन्हा एकदा सुखाच्या ट्रॅकवर परतली.
प्रकाश लालाजी उईके (३०, रा. राजना, पांढुर्णा) असे त्याचे नाव आहे. त्याला लिहीणे-वाचणे येत नाही़ १३ वर्षापूर्वी सुनिता यांच्यासोबत, त्याचे लग्न झाले आणि या जोडप्याला ९ आणि १२ वर्षाची दोन मुले आहेत़ विशेष म्हणजे, राजना गावातच त्याची आतापर्यंतची संपूर्ण हयात गेली़ गावाबाहेर काय आहे, हे त्याला कधी कळलेच नव्हते़ लिहिणे-वाचणे येत नसल्याने मोबाईलही नाही़ अशात सहा महिन्यापूर्वी एक दिवस तो गावातल्या काही मुलांसोबत कामाधंद्यासाठी म्हणून आयुष्यात प्रथमच बाहेर पडला़ पुणे येथे एका गुड बनविण्याच्या कारखान्यात तो गावातल्या मुलांसोबत रुजू झाला़ प्रकाशने कामातून मिळालेली पहिल्या महिन्याची मिळकत सहा हजार रुपये इकडे गावात पत्नी सुनिताकडे पाठवली़ दरम्यान, दिड-दोन महिन्यातच गावातली मुले प्रकाशला पुण्यातच सोडून परतली़ प्रकाश परतला नाही म्हणून सुनिता चिंतेत होती. प्रकाशने पाठविलेले सहा हजार रुपये तिने गावातील काही जाणत्यांच्या संगतीने प्रकाशला शोधण्यासाठी खर्च करून टाकले़ अखेर, तिने प्रकाश परत येईल, अशी आस सोडून टाकली होती़ तरी देखील प्रकाशच्या परतीकडे तिचे डोळे लागले होते आणि एक दिवस गावच्या सरपंचाला कुणाचा तरी फोन आला़़़ आम्ही नागपूर स्टेशनला येत आहोत़ तुम्ही या़़़ सुनीता एका नातेवाईकासोबत नागपूर रेल्वे स्थानकावर आली आणि प्रकाशची भेट होताच, तिच्या डोळ्यातूनच नव्हे तर प्रकाशच्या डोळ्यातूनही विरहाचा त्राण मागे टाकत आनंदाश्रू मोकळे झाले़ या घटनेमुळे रेल्वेस्थानकावरील अनेकांना गहिवरून आले.आपल्या आयुष्यात कधी असे वळण येईल, असे दोघांना स्वप्नातदेखील वाटले नव्हते. वेळ न घालवता दोघेही गावाच्या दिशेने निघाले.
असा आला नागपुरात
सोबतचे मित्र गेल्यानंतर एकटा प्रकाश पुण्यात भटकत होता. पत्नी आणि मुलांची खुप आठवण यायची मात्र, घरी कसे जायचे हेच त्याला सूचत नव्हते. दरम्यान, त्याला कोंबडी पालन केंद्रात काम मिळाले़ काही दिवसानंतर त्याने तेथील एका कामगाराला आपली व्यथा सांगितली आणि मला फक्त नागपूर पर्यंत तरी सोडून द्या, अशी विनवणी केली़ त्याचेही हृदय द्रवले आणि प्रकाशने कसे तरी राजना गावच्या सरपंचाचा मोबाईल मिळवला़ सहकामगाराने सरपंचाला फोन करत आम्ही नागपूरच्या मध्यवर्ती स्टेशनवर येत असल्याचे सांगितले़ सरपंचाने सुनिताला सांगितले आणि सुनिता मंगळवारी मध्यवर्ती स्थानकावर दाखल झाली़
दोघेही घेत होते एकमेकांचा शोध
नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचताच सहकामगाराने प्रकाशला पोलीस बुथ जवळ आणून सोडले आणि तो निघून गेला़ इकडे सुनिता स्थानकावर प्रकाशचा सर्वत्र शोध घेत होती़ प्रकाशला काय करावे कळत नव्हते़ मात्र, सुनिता आली तर आपण सापडावे म्हणून जिथे आहोत तिथेच थांबावे, असा निर्णय घेतला़ दरम्यान खाकी कपड्यात असलेल्या लोहमार्ग पोलिसाला त्याने त्याच्याजवळ असलेल्या कागदावरील नंबर लावूून देण्याची विनंती केली़ पोलिस फोन लावण्याच्या तयारित असतानाच, प्रकाशपुढे त्याला शोधत असलेली सुनिता उभी झाली आणि दोघांच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू तरळायला लागले़