उर्वरित कार्य दोन आठवड्यात पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश
नागपूर: सिमेंट रस्त्यांच्या कामामुळे अस्तित्व धोक्यात आलेल्या साडेसहा हजारांवर झाडांचे बुंधे मोकळे करण्यात मनपा प्रशासनाला यश आले आहे. सिमेंट मार्गाच्या बांधकामामुळे शहरातील १०४७२ झाडे सिमेंटच्या विळख्यात आली होती. यापैकी ६७५४ झाडांचे बुंधे मोकळे करण्यात आले असून उर्वरित ३७१८ झाडांचे बुंधे येत्या दोन आठवड्यात मोकळे करण्याचे निर्देश मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.
सिमेंट रस्त्यांच्या विळख्यातील झाडांसंदर्भात आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. बैठकीत अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांच्यास सर्व झोनचे कार्यकारी अभियंता प्रामुख्याने उपस्थित होते.
सिमेंट रस्त्याच्या बांधकामादरम्यान रस्त्यालगत असलेल्या बहुतांशी झाडांना सिमेंटचे आवरण करण्यात आले होते. कंत्राटदाराच्या चुकीमुळे हजारो झाडांचे अस्तित्वच धोक्यात आले होते. संपूर्ण देशात ‘ग्रीन सिटी’ म्हणून नागपूर शहराची ओळख आहे. मात्र या शहराच्या सौंदर्यात भर घालणा-या ‘ग्रीनरी’वरच आघात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत शहरात पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारी संस्था ग्रीन व्हिजील फाऊंडेशनने संस्थेचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या लक्षात ही बाब आणून देण्यात आली.
यासंदर्भात आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेत शहरातील सिमेंट रस्त्यामुळे अस्तित्व धोक्यात आलेल्या झाडांच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले. सर्वेक्षणाअंती शहरातील २५२३७ झाडांपैकी १४७६५ झाडे सुरक्षित आढळली. मात्र १०४७२ झाडांच्या अस्तित्वाला धोका असल्याचे दिसून आले. यावर तातडीने कार्यवाही करीत आयुक्त अभिजीत बांगर यांनी झाडांची बुंधे लवकरात लवकर मोकळे करण्याचे आदेश दिले. मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या या मोहिमेने गती पकडली असून आतापर्यंत ६७५४ झाडांची बुंधे मोकळा श्वास घेउ लागली आहेत तर अद्यापही ३७१८ झाडांची बुंधे मोकळी होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सिमेंट रोडमुळे धोक्यात आलेल्या सर्व झाडांचे अस्तित्व अबाधित राहावे, यासाठी दोन आठवड्यात उर्वरित सर्व झाडांचे बुंधे मोकळे करण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.