आरोग्य शिबिरे घेऊन रुग्णसेवा करणे हा चांगला उपक्रम आहे. अशी शिबिरे संपूर्ण जिल्ह्यात घेतली जावी. तसेच शिबिरात फक्त तपासणी करूनच थांबू नका तर रुग्ण चांगला होईपर्यंत त्यांना सेवा द्या, पाठपुरावा करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केले.
कोराडी येथे श्री श्री फाऊंडेशनतर्फे आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कोराडीतील विठ्ठल रुक्मिणी हनुमान मंदिर देवस्थानच्या परिसरात हे आरोग्य शिबिर आयोजिण्यात आले. श्री श्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संकेत बावनकुळे यांनी या शिबिराच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
याप्रसंगी महादुला न.प.चे अध्यक्ष राजेश रंगारी, धनंजय भालेराव, ज्योतीताई बावनकुळे, सरपंच सुनीता चिंचुरकर, उपसरपंच उमेश निमोणे, अनिल निधान, संजय मैंद, विठ्ठल निमोणे, संकेत बावनकुळे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, डॉ. अग्रवाल, डॉ. सवाई व अन्य उपस्थित होते.
सकाळी 9 वाजता सुरु झालेल्या या शिबिरात 1846 रुग्णांची तपासणी करून त्यांना नि:शुल्क औषधोपचार करण्यात आले. तपासण्यांमध्ये रक्त, स्तन कॅन्सर, हृदयरोग तपासणी, किडणी, डोळ्यांची तपासणी, मुत्राशय तपासणी, गॅस्ट्रो, दंत तपासणी, मधुमेह तपासणी, हाडांची तपासणी, स्त्रीरोग अशा विविध प्रक़ारच्या तपासणी करण्यात आल्या. विविध विषयांची तज्ञ डॉक्टर या शिबिरात उपलब्ध होते.
प्रत्येक रोगांच्या तपासणीसाठी वेगवेगळे कक्ष तयार करण्यात आले. सर्व रुग्णांची नोंदणी केल्यानंतरच त्यांना या शिबिराचा लाभ देण्यात आला. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला. शक्य त्या औषधी या शिबिरात उपलब्ध करून देऊन रुग्णांना त्या नि:शुल्क देण्यात आल्या. या शिबिरात सुमारे 200 डॉक्टरांची चमूने रुग्णांना सेवा उपल÷ब्ध करून दिली. आशा हॉस्पिटल कामठी येथून 25 डॉक्टर, मेयो रुग्णालयातून 80 डॉक्टर, मेडिकल रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांनी या शिबिरात भाग घेऊन गरीब रुग्णांना आपल्या सेवा नि:शुल्क उपलब्ध करून दिल्या. तसेच डॉ. प्रीती मानोडे यांच्या 15 डॉक्टरांच्या चमूने या शिबिरात सक्रिय सहभाग दिला. डॉ. सुनील फुडके यांनी डोळे तपासणीचे मशीन नि:शुल्क उपलब्ध करून दिले होते. दुपारी 3 वाजेपर्यंत असलेले शिबिर लोकांच्या मागणीमुळे त्यानंतरही सुरु ठेवावे लागले.