सकाळी 10 वाजता सिनेमॅक्स येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
नागपूर: कारगिल विजय दिनानिमित्त उद्या शुक्रवार दि.26 जुलै रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृहात “URI-The Surgical Strike” हा चित्रपट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रसारित करण्यात येत आहे.
सिताबर्डी येथील सिनेमॅक्स चित्रपटगृहात (ईंटरनिटीमॉल) येथे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता कारगिल विजय दिन साजरा करण्यात येणार आहे. यावेळी शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक,अधिकारी यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
26 जुलै हा दिवस “कारगिल विजय दिन” म्हणून साजरा केला जातो. राज्यातील युवकांमध्ये सैन्याबद्दल कर्तव्य भावना आणि अभिमान वृध्दींगत व्हावा, याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शना खाली दिनांक 26 जुलै 2019 रोजी सकाळी 10वाजता संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहात “URI-The Surgical Strike” या चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
चित्रपट हा 18 ते 25 वर्ष वयोगटातील युवकांनी या सिनेमाव्दारे प्रेरित व्हावे याकरिता महाविद्यालयातील युवकांसाठी विशेष शो दाखविण्यात येणार आहे. महाविद्यालयातील प्राचार्यांनी ठरवून दिलेल्या चित्रपटगृहात विद्यार्थ्यांना चित्रपट शो पाहण्याबाबत सूचना द्याव्यात, असे निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यांनी आवाहन केले आहे.